जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला जितके आरक्षण मिळाले आहे, त्यामध्ये समाधान मानावे, असे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जरांगे-पाटील यांनी एकेरी भाषेत विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. राहुल गांधी (Rahul Gandhi) असले नेते कसे काय निवडतात, असेही जरांगे यांनी म्हटले. ते शुक्रवारी अंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?


मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दात आता दम राहिलेला नाही. जे मिळालंय, त्यामध्ये त्यांनी समाधानी राहावे. जरांगे-पाटील यांच्या बोलण्यात आता गर्व आणि गुर्मी जाणवते. अशाने जरांगे पाटील यांचा हार्दिक पटेल होईल, अशी खोचक टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती.


राहुल गांधी असले नेते कसे काय निवडतात? जरांगे संतापले


विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी एकेरी भाषेत बोलताना विजय वडेट्टीवार यांना चांगलेच फटकारले. वडेट्टीवारांनी आम्हाला दम वगैरे शिकवू नये. राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या नादाला लागायला, टीका करायला सांगितले आहे का? हा विरोधी पक्षनेता आहे की कोण आहे? विरोधी पक्षनेता तुझ्या घरातलं पद नाही, ते जनतेचं पद आहे. विरोधी पक्षनेता कोणत्याही एका जातीचा नसतो. आमचा दम कशाला काढता, आमचा दम तुम्ही मुंबईत बघितला नाही का? राहुल गांधी साहेब असले नेते कशाला निवडतात काय माहिती. तू तुझ्या पक्षाचं बघ ना. नाहीतर सगळा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल. त्यामुळे राहुल गांधी यांनी वडेट्टीवारांना नीट बोलायला सांगावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


मनोज जरांगे आणि बारसकरांनी त्यांच्या वैयक्तिक वादात सरकारला खेचू नये: उदय सामंत


मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये. त्या दोघांमधील वाद हा वैयक्तिक असून त्यात सरकारचा काडीमात्र संबंध नाही. त्यात सरकारला पडण्याची गरज नाही. त्यांच्या या वादात नाहक सरकारला ओढू नये, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील आणि बारसकर महाराज यांना केले आहे. पुण्यामध्ये इंडिया आघाडीच्या मेळाव्यावर बोलताना इंडिया आघाडीने त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करून दाखवावा, असे आव्हान ही सामंत यांनी दिले. दरम्यान, गुजरातमध्ये महानंदा डेअरी जाणार असल्याच्या चर्चेवर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. सामंत पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


आणखी वाचा


मनोज जरांगे पाटील यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा