Delhi Crime News : दिल्ली क्राईम ब्रांचचं (Delhi Crime Branch) पथक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचलं. दिल्लीतील सरकार (Delhi Government) पाडण्यासाठी भाजपने (BJP) आपचे (AAP) आमदार (MLA) फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी नुकताच केला होता. या संदर्भात दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी (Delhi Crime Branch) शुक्रवारी केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, मात्र यावेळी केजरीवाल निवासस्थानी उपस्थित नव्हते. दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांना नोटीस बजावत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या भाजपवर केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे. दिल्ली क्राइम ब्रँचचे एक पथक मंत्री आतिशी मार्लेना यांच्या घरीही पोहोचले. दरम्यान, त्या चंदीगडमध्ये असल्याची माहिती आहे.


केजरीवालांच्या घरी दिल्ली पोलिसांचं पथक


भाजपने आम आदमी पक्षाचे आमदार फोडल्याचा दावा अरविंद केजरीवाल आणि आतिशी मार्लेना यांनी कोणत्या आधारावर केला, हे दिल्ली क्राइम ब्रँच टीमला जाणून घ्यायचं आहे. भाजपने आपचे आमदारांवर फोडल्याचा आरोप कोणत्या आधारावर केला याची चौकशी सध्या दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणता पुरावा आहे? काही पुरावे असल्यास गुन्हे शाखेला द्या, त्यांची चौकशी केली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला होता की, त्यांच्या आप पक्षाच्या 7 आमदारांनी भाजपशी संपर्क साधला होता. भाजपने तात्काळ त्यांचे आरोप निराधार असल्याचे ठरवून याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली असून याप्रकरणी तपास सुरु आहे.


केजरीवालांना पाचव्यांदा ईडीचं समन्स


दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी (Delhi New Excise Policy) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने पाचव्यांदा समन्स बजावलं आहे. यापूर्वी, चार समन्समध्ये सीएम केजरीवाल एजन्सीसमोर हजर झाले नव्हते आणि यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता पाचव्यांदा समन्स बजावत केजरीवाल यांना 2 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं.