Delhi Crime News : दिल्लीमध्ये (Delhi News) 20 ते 25 कोटींच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. उमराओ सिंह या शोरूममधून सोमवारी चोरांनी सर्वच्या सर्व दागिने चोरून नेले. रविवारी रात्री दुकान बंद करून मालक घरी गेले. सोमवारी दुकान बंद असतं. आज सकाळी दुकान उघडल्यावर दागिने लंपास झालेले दिसले.
देशाची राजधानी दिल्लीतील जंगपुरा येथील ज्वेलर्सच्या शोरूममध्ये कोट्यवधींची चोरी झाली आहे. दुकानात ठेवलेले 20 ते 25 कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेल्याचं शोरूम मालकांचं म्हणणं आहे. जंगपुरा येथील ज्या शोरूममध्ये चोरट्यांनी हात साफ केला, ते उमराव सिंह आणि महावीर प्रसाद जैन यांचं शोरूम आहे. दुकानात 20 ते 25 कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने ठेवण्यात आल्याचं शोरूम मालकानं सांगितलं आहे. जंगपुरा बाजार सोमवारी बंद असतो. त्यामुळे रविवारी शोरूम बंद केल्यानंतर मालक थेट आज (मंगळवारी) शोरुममध्ये गेले. त्यांनी दुकानाचं टाळं उघडलं आणि पाहिलं, तर त्यांना धक्काच बसला.
शोरुम मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शोरूममध्ये ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. दार उघडलं त्यावेळी एकही दागिना शोरूममध्ये नव्हता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ तपास सुरू केला. टाळं तर शोरूम मालकांनी उघडलं मग चोरांनी चोरी कशी केली? असा प्रश्न सर्वांच्यात मनात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी छत कापलं आणि तिथून शोरूममध्ये प्रवेश केला आणि हात साफ केला.
स्ट्राँग रूमची भिंत कापून चोरट्यांनी आत प्रवेश
दरम्यान, जंगपुरा मार्केटच्या या इमारतीत अनेक दुकानं होती, शोरूमच्या शेजारीच पायऱ्या आहेत, जिथून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्यासाठी छत कापलं होतं. कापलेल्या छताची व्हिडीओ क्लिपही समोर आली असून, त्यात चोरट्यांनी छोटी जागा कापून दुकानात प्रवेश केल्याचं दिसत आहे. मात्र, या घटनेचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अद्याप समोर आलेले नाहीत, ज्यावरून चोरट्यांची ओळख पटू शकेल.
हिरे-सोन्याचे सगळे दागिने लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी सोन्याचे आणि हिऱ्याचे सर्वच्या सर्व दागिने लंपास केले. परंतु, चांदीचे काही दागिने शिल्लक असल्याचं बोललं जात आहे. शोरुमचे मालक रविवारी साधारणतः साडेआठ वाजता दुकान बंद करून गेले होते. पोलिसांचं म्हणणं आहे की, ही चोरी रविवारी रात्री झाली असावी.