परभणी: नेहमी वादग्रस्त वक्तव्य आणि एकामागून एक वादामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आता ठाकरे गटाचे परभणीचे (Parbhani) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना लक्ष केले आहे. बांगर यांनी एका कार्यक्रमात बोलतांना खासदार जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत खोचक टीका केली आहे. 'लोकांचं रक्तही तुम्हाला कमी पडले', असल्याचा टोलाही बांगर यांनी खासदार जाधव यांचे नाव न घेता लगावला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार जाधव यांनी आमदार बांगर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळेच त्यांच्या टीकेला बांगर यांच्याकडून उत्तर देण्यात आल्याची चर्चा आहे.
नेहमी कोणत्या कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे आमदार संतोष बांगर हे ठाकरे गटाच्या खासदारावर केलेल्या टीकेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. परभणीचे उद्धव गटाचे खासदार संजय जाधव यांना लक्ष करत बांगर यांनी जोरदार टीका केली आहे. परभणीमधील एका गणपती आरतीसाठी संतोष बांगर सोमवारी रात्री शहरात आले होते. यावेळी, बोलतांना त्यांनी नाव न घेता खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "तुम्ही आमदार होण्यापूर्वी तुमची परिस्थिती काय होती आणि आता तुम्ही काय आहात हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक तरुणांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून तुम्ही स्वतःची पोळी भाजुन घेतली, असल्याची टीका बांगर यांनी खासदार जाधव यांच्यावर केली.
पुढे बोलतांना बांगर म्हणाले की, "तुम्हाला लोकांचे रक्तही कमी पडले, एवढं रक्त तुम्ही पिताय. तसेच एक लोकप्रतिनिधी असताना जनतेला तुम्ही कमरे खालच्या भाषेत शिवीगाळ करता. 2024 च्या निवडणुकीत इथली जनता तुमची जागा तुम्हाला दाखवून देईल, असाही घणाघात बांगर यांनी यावेळी केला.
बांगर यांच्याकडून परतफेड...
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते एकेमकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या संपर्क अभियानात हिंगोलीत गेल्यानंतर आमदार बांगर यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता परभणीत आल्यावर बांगर यांनी खासदार जाधव यांच्यावर निशाणा साधत परतफेड केली आहे. आता बांगर यांच्या टीकेवर खासदार संजय जाधव काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आगामी काळात या दोन्ही गटातील आरोप-प्रत्यारोप आणखीनच टोकाला जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Hingoli : हातात तलवार घेऊन 'शक्तिप्रदर्शन' करणं महागात पडलं, आमदार बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल