Delhi Crime : दिल्लीमध्ये आणखी एक गुन्हेगारी घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने त्याच्या प्रेमिकेच्या हत्येचा कट रचला. त्याने तिला कारमध्ये बोलावलं आणि तिच्यावर हाथोडीने जीवघेणा हल्ला केला. यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो गाडी घेऊन रस्त्यावर फिरत होता. पण नेमका तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक केलं आणि जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. दिल्लीतील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आरोपीकडून प्रेमिकेवर जीवघेणा हल्ला
आरोपीने प्रेमिकेच्या डोक्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे तरुणीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर हा तरुण गाडीतच तिला घेऊन रस्त्यावर फिरू लागला. यावेळी तो अतिशय घाबरलेला होता. त्यामुळे या गडबडीत त्याचा अपघात झाला. त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीला टक्कर मारली. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचली. मात्र, पोलिसांनं वेगळंच चित्र पाहायला मिळालं. गाडीमध्ये एक तरुणी गंभीर अवस्थेत होती.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फिरत होता आरोपी
आरोपी आणि पीडिता आधी एकत्र राहत होते. त्याच्यामध्ये काही कारणावरून भांडण झाल्याने ते वेगवेगळे राहत होते. आरोपीने महिलेला भेटण्यासाठी बोलावलं. यावेळी त्याने तिच्या डोक्यावर हातोडीने हल्ला केला. या हल्ल्यात प्रेमिकेचा मृत्यू झाला असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याची घाबरगुंडी उडाली. या घबराटीमुळे त्याने दुसऱ्या गाडीला टक्कर दिली आणि पोलिसांसमोर हे प्रकरण पोहोचलं. पण, पोलिसांनी तपासलं असता, तरूणी गंभीर जखमी झाली होती, त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आरोपीला तरुणीकडून घ्यायचा होता बदला
द्वारकाचे डीसीपी एम हर्षवर्धन यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं आहे की, आरोपीचं नाव साहिल कुमार असून तो दिल्ली जल बोर्डाचा (DJB) कंत्राटी कर्मचारी आहे. तो पश्चिम दिल्लीतील टिळक नगरमध्ये एका महिलेसोबत एकत्र राहत होता, पण या वर्षी जानेवारीमध्ये दोघांमध्ये भांडण झाले, त्यामुळे तरुणी त्याला सोडून गेली. यानंतर आरोपीला तरुणीकडून बदला घ्यायचा होता. त्यामुळे त्याने तिला बोलावून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.
नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी आरोपीने तरुणीला भेटीसाठी बोलावले आणि कारमध्येच तिच्यावर हल्ला केला. त्याने कारमध्ये तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. आरोपीला वाटलं तरुणीचा मृत्यू झाला, त्यानंतर तो तिचा मृतदेह नाल्यात किंवा दुसऱ्या ठिकाणी फेकण्यासाठी इकडे-तिकडे फिरू लागला. यावेळी, द्वारका सेक्टर-3 येथील एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या कारला त्याने धडक दिली. यानंतर हॉटेल मालकाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी पळू लागला. मात्र, काही अंतर गेल्यावर त्याला पकडण्यात आलं. घटनास्थळी उपस्थितांना गाडीमध्ये एक तरुणी दिसली. तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत होती आणि तिचे अंग थरथरत होतं. यानंतर स्थानिकांना पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर या घटनेचा उलगडा झाला.