Deekshabhoomi Underground parking project : दीक्षाभूमी वर काल घडलेल्या तोडफोड प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांसह विविध सामाजिक संघटनांच्या 15 ज्ञात व इतर अनेक अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीक्षाभूमीवर झालेले हिंसक आंदोलन आणि बांधकाम साहित्याची तोडफोड व आग लावल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी बजाज नगर पोलीस स्टेशन मध्ये अखेर गुन्हा दाखल केला आहे.


 सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल 


पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 15 ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडेंचेही नाव आहे. याशिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


नेमकं प्रकरण काय?


दीक्षाभूमीवरील (Dikshabhumi) सौंदर्गीकरण आणि आधुनिकीकरणास सुरुवात करण्यात आली. मात्र, दीक्षाभूमीवरिल अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला होता.  दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन सुरू केले होते. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली होती. तर इतर विकासकामाला आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी बोलताना व्यक्त केले होते. 


देवेंद्र फडणवीसांकडून अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती


दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्दा विधानसभेतही चांगलाच गाजला होता. जनभावना लक्षात घेत शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती देत असल्याची घोषणा केली होती. मात्र,आम्हाला जोपर्यंत याबाबत लिखित स्वरूपात आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. आता मात्र, हिंसक आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते? 


दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात आली असली तरी येथे पार्किंग होणार नाही, अशी भूमिका घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वत: सभागृहात येऊन याबाबतचे आवाहन केले पाहिजे. दीक्षाभूमी परिसरातील स्थानिकांनी बऱ्याचदा विरोध दर्शवला आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळेच दीक्षाभूमी परिसरात आंदोलन झाले. तिथल्या स्थानिकांनी अनेकदा विरोध केला आहे आमचाही या तारखेला विरोध आहे. ही जागा खुलीच राहिली पाहिजे. खुले मैदान आज राहिलेच नाहीत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Raju Shetti on Vilasrao Deshmukh : गुजरातवरुन मुंबईला येणारे दुधाचे टँकर आम्ही अडवले होते, तेव्हा विलासराव देशमुखांनी अमेरिकेवरुन रात्री 2 वाजता फोन केले : राजू शेट्टी