Mumbai Crime News मुंबई: नंदीग्राम एक्स्प्रेसच्या (Nandigram Express) शौचालयात 35 वर्षीय प्रवाशाचा मृतदेह सापडल्यानंतर दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Nandigram Express Murder Case) तीन दिवसांनी दादर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब साबळे असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील रहिवासी होता. साबळे यांनी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.


सदर प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी मयत साबळे यांची पत्नी सुनीता हिची चौकशी केली. ज्यात तिने आरोप केला आहे की, साबळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने मानसिक तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. तसेच एका महिलेला पाहून अश्लील चाळे केल्याचा साबळे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी घाटकोपरमधील असल्फा गावात साबळे नाला साफ करत होते. यावेळी त्याची लुंगी सुटली, नेमकं त्याचवेळी महिलेचं लक्ष त्याकडे गेले. यावेळी महिलेला साबळे त्यांच्याकडे पाहून अश्लील चाळे करत असल्याचा समज झाला. महिलेने या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बीएनएस कलम ७९ अन्वये साबळेंवर गुन्हा नोंदवला. एफआयआरची माहिती मिळताच साबळे अटक टाळण्यासाठी हिंगोली गावी गेले.


मृत साबळेंच्या पत्नीचे आरोप काय?


घाटकोपर पोलीस वारंवार पतीची चौकशी करत होते. शिवाय चौहान, तिचा पती व नातेवाईक वारंवार तिच्या घरी येऊन त्रास देत होते. अशात शिवसेनेचे माजी नगरसेविका किरण लांडगे यांनीही साबळे व त्यांच्या पत्नीला धमकावले असल्याचा आरोप साबळेंच्या पत्नीने  केला आहे. मुंबईत परत असताना पून्हा पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागेल, समाजातही त्याची चर्चा होऊन बदनामी होईल या भितीने नैराक्षेतून साबळे यांन नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले. दरम्यान साबळेंच्या पत्नीच्या तक्रारीनुसार रसिला चौहान, तिचा पती महेंद्र चौहान, संतोष चौहान आणि अंतेश चौहान तसेच किरण लांडगे यांच्याविरुद्ध कलम १०८ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), ३५१ (२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला सुरू केले आहे.


नेमकं प्रकरण काय?


नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात 09 ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना समोर आली होती. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात साबळे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले होते.  स्वतःला गळफास लावण्यासाठी त्याच्याकडील मफलरचा वापर केल्याचं समोर आलं होतं. मृत व्यक्ती मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि साबळे या प्रकरणात फरार होते.


संबंधित बातमी:


नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; दादर रेल्वे स्टेशनवर पुन्हा खळबळ