Cyber frauds : बनावट लोन अॅप्लिकेशनद्वारे चीनी लोकांकडून भारतीयांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यातच आता चिनी माफियांकडून रोजगाराच्या शोधात असलेल्या भारतीय तरुणांना नोकरीच्या बहाण्याने म्यानमारमध्ये डांबून ठेवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी नुकताच अशाच एका सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय. या संपूर्ण प्रकरणात शान मन्सूरी या तरूणाच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी लखनौ येथून एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे.


प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्यानमारमध्ये अडकलेल्या सुमारे 300 भारतीयांना परत आणण्याची विनंती केली आहे. यात एकट्या महाराष्ट्रातून 250 ते 300 लोक अडकले असून देशातील विविध राज्यातील पंधराशेहून अधिक नागरिक सध्या म्यानमारमध्ये तुरुंगात आहेत, असा दावा पीडितांच्या कुटुंबीयांनी केलाय. 


अशी होते फसवणूक 


चीनी माफिया फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया साइट्सच्या मदतीने रोजगाराच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांशी संपर्क साधतात. नामांकित परदेशी कंपन्यांचे नाव घेऊन रोजगार देण्याचे आश्वासन देतात. त्यासाठी तरुणांना त्यांच्या शैक्षणिक क्षमतेनुसार नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात येते. तरुणांच्या मनात कोणतीही शंका येऊ नये म्हणून त्यांना कंपनीकडून ऑफर लेटर, जॉईनिंग लेटर तसेच इतर गोष्टी पुरवल्या जातात. त्यानंतर त्यांना थायलंडमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले जाते. हे तरुण थायलंडला पोहोचल्यानंतर त्यांना जंगलातून म्यानमारला नेले जाते. त्यानंतर त्यांना म्यानमारच्या जंगलात बनवलेल्या डिटेन्शन सेंटरमध्ये डांबून ठेवले जाते. तुरुंगात डांबलेल्या लोकांकडून प्रेमाच्या नावाखाली फसवणूक केली जाते. तुरुंगात टाकलेल्या लोकांना त्यांची ओळख लपवून लोकांशी बोलण्यास सांगितले जाते आणि त्यांना क्रिप्टो करेंसीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. यासाठ प्रत्येक व्यक्तीला ठराविक टार्गेट दिले जाते. जर कोणी हे टार्गेट पूर्ण केले नाही तर त्याला मारहाण केली जाते. शिवाय इलेक्ट्रिक शॉक देखील देण्यात येतो.  
 
शान मन्सूरी याने वांद्रे पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  त्याच्या तीन मित्रांना मुंबई विमानतळावरून प्रथम थायलंड आणि नंतर जंगलमार्गे म्यानमारला नेण्यात आले. शान मन्सूरी 20 जणांच्या ग्रुपसोबत थायलंडला जाणार होता. हे सर्व लोक ग्रुपने मुंबईहून थायलंडला जात होते.पण कालांतराने शानच्या मित्रांनी तो म्यानमारमध्ये अडकल्याची माहिती दिली आणि त्यानंतर शानने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. शाहबाज खान, साकिब अली सय्यद आणि याकूब सय्यद हे शानचे तीन मित्र या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई ते थायलंड आणि नंतर म्यानमारला गेले आहेत. सध्या ते म्यानमारमध्येच आहेत. 


दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक अॅडव्हायजरी जारी करून रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना ऑनलाइन घोटाळ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. 


महत्वाच्या बातम्या


Cambodia Cryptocurrency Fraud : महाराष्ट्रातील तरुण अडकला कंबोडियात, गुलामगिरीतून स्वत:सह सात भारतीयांची 'अशी' केली सुटका