Cambodia Cryptocurrency Fraud : ज्यांना इतिहासाचे ज्ञान आहे त्यांना अमेरिकेतली गुलामगिरी माहिती आहे. आपल्याकडे पण वेठबिगारी चालली. पण आधुनिक काळात जगाच्या पाठीवर उच्च शिक्षितांना थेट गुलाम करून काम करवून घेतले जात असेल तर? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याचा आपल्याशी काय संबंध आहे….? तर ही बातमी वाचा... ही बातमी अधुनिक सायबर गुलामगिरीची आहे. ही बातमी लग्न जुळवणाऱ्या भारतीय साईटवरच्या खोट्या प्रोफाईलची आहे. क्रिप्टो करन्सीत पैसे गुंतवून खोट्या परताव्याची ही बातमी आहे. गेल्या महिन्यापर्यंत पुण्यातल्या आयटी कंपनीत आर्थिक सिक्युरिटीज विश्लेषक म्हणून कबीर शेख काम करत होता. कबीरला कधीही वाटले नव्हते की आपणं कंबोडिया देशातल्या चिनी सायबर-घोटाळ्यांसाठीचा एक गुलाम ठरू. 


याची सुरूवात कशी झाली?


उस्मानाबादचा खाजगी महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर कबीर 2014 साली तैवानला गेला. तैवानला पदव्युत्तर शिक्षण घेतले. कबीरला चिनी भाषा बोलता येते. यामुळे कबीरला कंबोडियात सायबर सेक्युरिटी तज्ज्ञ म्हणून काम करण्याची ॲाफर आली. पगार मिळणार होता पाच हजार डॅालर. कबीर पुण्याहून बेंगळुरू, बेंगलूरू ते बॅकांक आणि मग बँकाकहून कंबोडिया असा प्रवास करत या कंपनीत पोहोचला. कबीरसोबत सात भारतीय होते. यामध्ये एक मुलगी होती. सात जण कंपनीच्या आवारात पोहोचले. कंपनीचे कंपाऊंड पंधरा फुट उंच. त्यावर तारेचे काटेरी जाळे. कंपनीच्या आत मध्येच शिरताच कबीरला पहिला धक्का बसला. कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचं कबीरला दिसलं, यानंतर कबीरच्या पायाखालची जमीनच घसरली.




मॅट्रिमोनियल साईटवर बनावट खाती बनवण्याचं काम


दुसऱ्या दिवशी कबीर आणि भारतीयांसाठी एकच काम होतं, ते म्हणजे शादी डॅाट कॅाम, जीवनसाथी डॅाट कॅाम, डिवोर्सी डॅाट कॅाम या लग्नासाठी जोड्या जमवणाऱ्या साईटवर खोटी प्रोफाईल तयार करायची. सुंदर मुलींचे फोटो इंस्टाग्रामवरून डाऊनलोड करून घ्यायचे. प्रोफाईलवर जोडायचे. भारतीयांसोबत चॅटींग सूरू करायची. कंपनीकडे असे सॉफ्टवेअर आहे, जे एकाच वेळी 20 ते 30 व्हॉट्सअॅप खात्यांमध्ये लॉग इन करते. चिनी भाषेतील संदेश कोणत्याही भाषेत अनुवादित होतो.


पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रतील तरुणाने कंबोडियातील सायबर गुन्हेगारीतून कशी केली सुटका?



भारतीयांना क्रिप्टो करन्सीत फसवण्याचं रॅकेट


भारतीयांना फसवून क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करायला सांगणाऱ्या 200 हून अधिक कंपन्या कंबोडियामध्ये आहेत. या कंपन्यांमध्ये प्रत्येक देशासाठी वेगवेगळा कंपार्टमेंट आहेत. कबीरच्या मते रोज पाच कोटीहून अधिक रक्कमेला भारतीयांना फसवले जात आहे. हे काम करणार नाही असे कबीर आणि सात भारतीयांना सांगितल्यावर कबीर आणि इतरांचा छळ सूरू झाला. यानंतर कबीरने अथक प्रयत्नांनंतर कुटुंबियांसोबत संपर्क साधून खरी कहानी सांगितली. त्यानंतर कबीरच्या वडिलांनी करून उस्मानाबाद पोलिसांत धाव घेतली. 


कंबोडियन पोलिसांनी कारवाई करत केली सुटका


22 दिवसांच्या भयंकर अनुभवानंतर सुदैवाने कबिर आणि इतर सात भारतीयांची सुटका झाली आहे. कबीर पुण्यात परत आला आहे. अजूनही 15 भारतीय मुले-मुली कंबोडियात अडकली आहेत. भयंकर यातना सहन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय तरुणांना फसवणारे काही एजंट बिहार, बंगालमध्ये काम करत आहेत. कंबोडियातूनही मुलांना फसवून भारतात आणून त्यांच्याकडून हेच काम इथे करुन घेतलं जात आहे. आमचा प्रश्न आहे लग्न विषयक वेबसाईटला. एवढ्या सहजासहजी खोट्या प्रोफाईल कश्या बनतात. बाकी सायबर गुन्हे काय रूप घेत आहेत याचे हे धक्कादायक चित्र आहे त्यामुळे नागरिकांनो सावध राहा.


मानवाधिकार एनजीओ इंटरनॅशनल जस्टिस मिशनचे कंबोडिया संचालक जेक सिम्स यांच्या मते, कंबोडियामध्ये हजारो लोकांना स्कॅमिंग कंपाऊंडमध्ये काम करण्यास भाग पाडले जात आहे. कॅसिनो, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, निवासी विकास आणि ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये स्कॅमिंग कंपाऊंड्स देशभर पसरलेले आहेत. खिडक्या आणि बाल्कनीवरील तारचे बार. सभोवतालच्या कुंपणाला मजबूत करणारे काटेरी तार ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत. हजारो लोक येथे अडकले आहेत.


कंबोडिया हा आशियातील तिसरा सर्वात भ्रष्ट देश


उस्मानाबादचा कबीर आणि इतर सात भारतीय सुदैवी आहेत असे आम्ही का म्हणतोय….?  ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचारी देशाच्या निर्देशांकात कंबोडिया हा आशियातील तिसरा सर्वात भ्रष्ट देश आहे. पहिल्या क्रमांकांवर उत्तर कोरिया आणि दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तान आहे. कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन आणि त्यांच्या कंबोडियन पीपल्स पार्टीने जवळपास 40 वर्षे देशावर राज्य आहे. सध्या या देशात भ्रष्टाचार, क्रोर्य आणि दडपशाहीचे राज्य आहेत. स्वतंत्र माध्यमे नाहीत. टीकाकारांचा छळ होतो. मुख्य विरोधी पक्षावर बंदी घातली आहे. चीनशी या देशाचा संबंध वाढत आहे. या सगळ्यांचा कंबोडियातील सायबर गुलामगिरीशी संबंध आहे.