Mumbai Crime News : मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरच्या कारने दिलेल्या धडकेत एका बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य देसाई (वय 27) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी निवासी डॉक्टरला अटक केली आहे. त्याला कोर्टाने 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 


रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दक्षिण मुंबईतील केम्पस कॉर्नर येथील उड्डाणपूलावर हा अपघात झाला. पोलिसांमध्ये दाखल असलेल्या तक्रारीनुसार, आरोपी डॉक्टर रेहान रशीद (वय 27) हा बाबूलनाथहून हाजी अलीच्या दिशेने भरधाव वेगाने कार चालवत होता. या दरम्यान त्याने नियम मोडत दुसऱ्या मार्गिकेत प्रवेश करत समोरून येणाऱ्या बाइकला धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की, बाइकस्वार आदित्य हा उड्डाणपुलावरून 30 फूट खाली कोसळला. या घटनेनंतर कारचालक आरोपी डॉक्टर आणि इतर बाइकस्वारांनी त्याला तातडीने जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 


या अपघातात आदित्यला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर, मंगळवारी सकाळी त्याची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली. 


आरोपीच्या अटकेसाठी गावदेवी पोलीस ठाण्यात ठिय्या 


आरोपी निवासी डॉक्टरच्या अटकेसाठी गावदेवी पोलीस ठाण्यात मृत आदित्य देसाईचे नातेवाईक आणि मित्रांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आंदोलनात सहभाग घेत आरोपीच्या अटकेची मागणी केली. अखेर मंगळवारी रात्री पोलिसांनी आरोपी निवासी डॉक्टर रेहान रशीदला अटक केली. बुधवारी, आरोपीला गिरगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्याला एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha