Sangli Crime News : सांगलीतील दोन सराईत टोळ्यांना सांगली पोलीस दलानं दणका देत दोन टोळ्यांतील तब्बल 17 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. शहरातील वाढत्या गुन्ह्यांमुळे ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यात दोन्ही टोळीतील लोकांवर तब्बल 18 गुन्हे  दाखल होते. सांगली शहरात गेल्या काही दिवसांमध्ये खून, मारामाऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं. मागील आठवड्यात तर एकाच दिवशी दोन खून आणि एक हाफ मर्डर झाला होता. यामुळे सांगली पोलीस दलासमोर आव्हान उभं राहिलं होतं. दोन टोळ्यांवर केलेल्या या कारवाईमुळे सांगली शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारांना वचक बसण्यास मदत होईल. 


सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार गणेश सातपुते आणि ओंकार जाधव या दोघांच्या टोळीस सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी हे आदेश काढले आहेत. सातपुते यांच्या टोळीतील प्रमुख गणेश बाबासाहेब सातपुते (33), रोहित बाबासो सातपुते (32), हैदरअली हुमायुन पठाण (30), जाफर हुमायून पठाण (29), गणेश सुरेश मोरे (26), निखील सुनील गाडे (31), राहुल सावंता माने (29), सर्व रा. रमामातानगर, कुदळे प्लॉट यांचा यात समावेश आहे. 


जाधव यांच्या टोळीत टोळी प्रमुख ओंकार सुकुमार जाधव (29), शुभम कुमार शिकलगार (23) सुज्योत उर्फ बापू सुनील कांबळे (23), आकाश उर्फ अक्षय विष्णू जाधव (24), अमन अकबर शेख (20) कृपेश घनःश्याम चव्हाण (21), ऋषिकेश दुर्गादास कांबळे (21), साहिल हसेन शेख (22), राहुल रमेश नामदेव (29), प्रेमानंद इराप्पा अलगंडी (31), गणेश चन्नाप्पा बोबलादी (24) अशी या संशियतांची नावे आहेत.


सातपुते टोळीविरुद्ध सन 2017 ते 2022 मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, दमदाटी आणि शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा, स्त्रियांची छेडछाड, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे 9 गुन्हे सांगली शहर आणि मंगळवेढा, सोलापूर येथे दाखल आहेत.


जाधव टोळीविरुद्ध याच प्रकारचे 9 गुन्हे सांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्रामबाग व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सर्व संशयित कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये तडीपार प्रस्ताव सादर केला होता. त्यावर पोलीस अधीक्षक गेडाम यांनी चौकशी करून टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवालाची पाहणी करून सुनावणी घेतली. त्यानंतर गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी तडीपारीचा आदेश काढला आहे. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, अजय सिंदकर सिध्दाप्पा रुपनर, संजय पाटील, विक्रम खोत यांनी भाग घेतला आहे. 


ओंकार जाधव यांच्या टोळीविरुद्ध 9 गुन्हे


ओंकार जाधव यांच्या टोळीविरुद्ध 2013 ते 2022 या काळात खून, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रानं हल्ला, बेकायदा जमाव, मारहाण दमदाटी, शासकीय कामात अडथळा आणणं, असे गंभीर स्वरूपाचे 9 गुन्हे शहर ग्रामीण आणि विश्रामबाग,  मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे दाखल आहेत. या टोळी विरोधात तडीपारीचा प्रस्ताव शहर पोलीस यांनी पोलिस अधीक्षक यांना सादर केला होता. या टोळीला पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सहा महिन्यासाठी जिल्ह्यातून तडीपार केलं आहे.


गणेश सातपुते यांच्या टोळीविरोधातही गंभीर 9 गुन्हे


गणेश सातपुते यांच्या टोळीविरोधात देखील 2017 ते 2022 या काळात खून, खुनाचा प्रयत्न, घातक शास्त्राने दुखापत, महिलांची छेडछाड, विनयभंग असे गंभीर 9 गुन्हे सांगली शहर आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल आहेत, या टोळी विरुद्ध सांगली शहर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता, या टोळीला सुद्धा पोलीस अधीक्षक निश्चित गेडाम यांनी सहा महिन्यासाठी तडीपार केले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha