सांगली : नशेबाज मुलाच्या नाहक मागण्यांच्या त्रासाला कंटाळून एका बापाने आपल्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न करत हल्ल्याचा बनवा केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. या प्रकरणी राजेंद्र गाडेकर या शिक्षक पित्याला अटक करण्यात आली आहे. तर यामध्ये दुर्दैवाने फिर्यादी या त्यांच्या पत्नी आहेत. या दाम्पत्यचा जखमी मुलगा प्रतीक गाडेकर याच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या खात्यावर साडे तीन लाख रुपये जमा करावे, बंगला नावावर करावा, अशा मागण्यांच्या तगाद्यामुळे राजेंद्र गाडेकर यांनी हे पाऊल उचलले होते आणि त्याला कुणीतरी त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला असे भासवून पोलिसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्रामबाग पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे आणि त्यांच्या पथकाने या घटनेमागची सत्यता बाहेर काढली आणि शिक्षक पित्याचे बिंग फुटले.
सांगलीच्या 100 फुटी रोड येथील रामकृष्ण परमहंस सोसायटी येथे राहणाऱ्या राजेंद्र हिंदुराव गाडेकर यांनी आपला मुलगा प्रतीक गाडेकर (वय 22) याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगा प्रतीक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरजेच्या मिशन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुलाच्या खुनाच्या प्रकरणी राजेंद्र गाडेकर यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
शिक्षक असणारे राजेंद्र गाडेकर, त्यांची पत्नी वैशाली गाडेकर आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा त्यांचा एकुलता एक मुलगा प्रतीक हे तिघेजण रामकृष्ण परमहंस सोसायटी येथील स्वप्नपूर्ती बंगल्यात राहतात. प्रतीक हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांना त्याला लाडाने वाढवले. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रतीक हा नशेच्या आहारी गेला होता.आणि यातून प्रतीक हा वडील राजेंद्र गाडेकर यांच्याकडे त्याच्या बँक खात्यात साडे तीन लाख रुपये जमा करत बंगला नावावर करण्याची मागणी करत होता, तसेच यावरून प्रतीक आपल्या आई-वडीलांशी वाद घालत होता, यावर आई-वडिलांनी अनेक वेळा प्रतिकला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी गेलाला प्रतीक हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रविवारी पुन्हा त्याने पैसे आणि बंगला नावावर करण्याचा तगादा वडीलांच्याकडे लावला होता.
त्यामुळे या रागातून राजेंद्र गाडेकर याने मुलगा प्रतीक याचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी झोपेत असताना राजेंद्र गाडेकर यांनी प्रतीकच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला, त्यानंतर जखमी प्रतीक याला मिरजेच्या मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये राजेंद्र गाडेकर यांनी अज्ञात दोघा जणांनी आपल्या घरात येऊन हा हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास केला असता राजेंद्र गाडेकर आणि प्रत्यक्ष घटनास्थळीचा तपास यामध्ये विसंगती आढळून आल्याने, राजेंद्र गाडेकर हे खोटे बोलत असल्याचे निदर्शनास येताच विश्रामबाग पोलिसांनी राजेंद्र गाडेकर यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, राजेंद्र गाडेकर यांनी आपणच आपल्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याने खुनाचा बनाव उघडकीस आल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली आहे.
राजेंद्र गाडेकर, पत्नी वैशाली गाडेकर आणि मुलगा असे तिघांचे छोटेसे कुटुंब आनंदाने त्यांच्या स्वप्नपूर्ती या बंगल्यात राहत होते, मात्र मुलगा प्रतीक याला नशेची सवय लागली व छोटेसे कुटुंब अस्थिर बनले. मुलाच्या नाहक मागण्यांमुळे शेवटी शिक्षक असणाऱ्या राजेंद्र यांना पोटच्या मुलाचा जीव घेण्याची वेळ आली. सध्या प्रतीक रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे, तर मोठ्या लाडाने लहानाचे मोठे केले. त्या वडीलांना मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली असून दुर्दैवी बाब म्हणजे प्रतिकची आई व राजेंद्र गाडेकर यांची पत्नी वैशाली गाडेकर यांना आपल्या मुलाच्या खुनाच्या प्रयत्न प्रकरणी पती विरोधात फिर्याद दाखल करावी लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोन लहान मुलांमुळे आरोपी 24 तासांत जेरबंद
मुंबईतील जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड; आरोपी वॉर्डबॉयला अटक
गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; रस्त्यावर पळवत महिलेची हत्या
बारामतीत मुलगी झाली म्हणून नवऱ्याची महिलेला रुग्णालयात शिवीगाळ करत मारहाण!