थिरुवनंतपुरम : केरळ पोलिसांनी कोचीमधील प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट सुजीश पीएस याला अटक रविवारी (6 मार्च) केली आहे. सहा महिलांनी त्याच्याविरोधात बलात्कार, लैंगिक अत्याचार, छेडछाडीचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तक्रारदार महिला या टॅटू आर्टिस्ट सुजीशच्या क्लायंट होत्या. 


एका 18 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुजीश पीएसच्या टॅटू स्टूडिओ (Inkfected Tattoo Studio) मधील आपला वाईट अनुभव सांगितला. तिची ही पोस्ट व्हायरल झाली. यानंतर अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.


तरुणीने पोस्टमध्ये आरोप केला आहे की, "पाठीवर टॅटू करताना सुजीश पीएसने बलात्कार केला." मात्र या तरुणीने अद्याप तक्रार नोंदवलेली नाही. तरुणीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इतर महिला समोर आल्या. याच टॅटू आर्टिस्टने काही वर्षांपूर्वी केलेल्या लैंगिक अत्याचाराचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.


कोची शहराचे पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांनी सांगितलं की, "आम्ही तक्रारदारांचा जबाब नोंदवत आहोत. आतापर्यंत आमच्याकडे आरोपीविरोधात सहा प्राथमिक तक्रारी दाखल झाल्या आहे. आरोपी फरार होता. त्याच्यावरील सर्व आरोप अजामीनपात्र आहेत. पोलिसांनी आरोपीला चहूबाजूंनी वेढल्यानंतर त्याने समर्पण केलं."


आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. इतरही टॅटू स्टुडिओ आहेत, परंतु त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. सर्व तक्रारी एकाच व्यक्तीविरोधात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.


सुजीश पीएसने शनिवारी (5 मार्च) रात्री उशिरा आत्मसमर्पण केलं आणि सुरुवातीच्या चौकशीनंतर त्याला चेरनल्लूर पोलीस स्टेशला नेण्यात आलं.त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानच्या कलम354 376 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.


दरम्यान, टॅटू आर्टिस्ट सुजीश पीएसचं वय 35 वर्षे आहे. सुजीश पीएस मागील दहा वर्षांपासून कोचीमध्ये एक टॅटू स्टुडिओ चालवतो. त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी महिलांचे आरोप नाकारले आहेत. "टॅटू छुप्या पद्धतीने केलेले नाहीत. शिवाय त्याने कोणत्याही महिलेचं लैंगिक शोषण केलेलं नाही," असा दावा त्यांनी केला आहे.