Sanjay Raut : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या ठिकाणी लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याचठिकाणी शिवाजी पार्कवर संपूर्ण जगाला प्रेरणा देता येईल असे स्मृतीस्थळ बनवावे अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. लतादीदी या देशाचा अनमोल ठेवा होत्या. त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करु नका असे राऊत यावेळी म्हणाले. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक राज्य सरकार, केंद्र सरकार करेल असे राऊत यावेळी म्हणाले.
लता मंगेशकर या कोणत्याही पक्षाच्या नेत्या नव्हत्या. त्या आपला अनमोल ठेवा होत्या असे राऊत म्हणाले. दरम्यान, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील राम कदम यांच्यावर टीका केली आहे. लता मंगेशकर आणि शिवसेना यांचे अगदी जवळचे संबंध होते. त्यांना कधीही विसरता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यांचा आम्ही पूर्ण सन्माम करत आहोत. राम कदम यांनी या मुद्यावरुन राजकारण करु नये असे त्या म्हणाल्या. संपूर्ण देश त्यांच्या निधनानंतर दु:खात असल्याचे चतुर्वेदी म्हणाल्या.
काल लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आता भाजपकडून लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं अशी मागणी केली जात आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी राम कदमांनी केली आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनवावं. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल, असं राम कदमांनी म्हटलं आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल सकाळी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले.
महत्त्वाच्या बातम्या: