Delta Variant : कोरोना महामारी सुरु झाल्यापासून जगभरात कोरोना विषाणूचे 400 हून अधिक प्रकार आढळून आले आहेत. यापैकी अल्फा, बीटा, डेल्टा, ओमायक्रॉन हे प्रकार अधिक धोकादायक मानले गेले आहेत. डेल्टा प्रकार गर्भवती महिलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. डेल्टामुळे (Delta Variant) एक्टोपिक गर्भधारणा म्हणजेच अस्थानिक गर्भधारणा होण्याचा धोका तीन पटीने वाढला.


आयसीएमआर (ICMR) च्या शास्त्रज्ञांनी 1660 गर्भवती महिलांचा अभ्यास केला आहे. हा अभ्यास मुंबईतील बीवायएल नायर रुग्णालयात पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान करण्यात आला. एका अहवालानुसार, ICMR वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल भजभिये यांनी सांगितले की, 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारीची पहिली लाट आली तेव्हा त्या काळात एक हजार गर्भवती महिलांपैकी 6 महिलांना एक्टोपिक गर्भधारणेचा धोका होता. त्यानंतर जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि डेल्टा प्रकार पसरला तेव्हा दर हजारी महिलांमागे 18 ते 19 महिलांना एक्टोपिक गर्भधारणा होण्याचा धोका होता. म्हणजेच, डेल्टा प्रकारामुळे, एक्टोपिक गर्भधारणेचा धोका तीन पटीने वाढला आहे.


काय आहे अस्थानिक गर्भधारणा?
गरोदरपणात 'एक्टोपिक प्रेग्नन्सी' ही एक गंभीर अशी स्थिती असून यामध्ये गर्भधारणा ही गर्भाशयात होण्याऐवजी गर्भनलिकेमध्ये होते. Ectopic pregnancy ला मराठीमध्ये स्थानभ्रष्ट गर्भधारणा किंवा अस्थानिक गर्भधारणा असेही म्हणतात.


कोविड संसर्गामुळे प्री-एक्लॅम्पसियाचा धोका वाढतो - अभ्यास
दरम्यान, दुसर्‍या अभ्यासानुसार, गर्भधारणेदरम्यान कोरोनाची लागण झालेल्या महिलांना प्री-एक्लॅम्पसिया होण्याचा धोका जास्त असतो. हा आजार जगभरातील माता आणि अर्भक मृत्यूचे प्रमुख कारण आहे. प्री-एक्लॅम्पसिया म्हणजे गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यानंतर रक्तदाब वाढणे.


अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की, गरोदरपणात sar cov 2 संसर्ग झालेल्या महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान संसर्ग नसलेल्या महिलांपेक्षा प्रीक्लेम्पसिया होण्याची शक्यता 62 टक्के अधिक असते. ज्यांच्या मातांना गर्भधारणेदरम्यान Pfizer-BioNtech आणि Moderna COVID-19 लस मिळाल्या होत्या, त्यापैकी 36 नवजात मुलांच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, 100 टक्के बाळांमध्ये जन्माच्या वेळी अँटीबॉडीज् आढळल्या.



संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha