नाशिक : मालेगाव (Malegaon) येथील नामको बँकेच्या (Merchant Bank) शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे 'व्होट जिहाद'साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. यानंतर ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी किरीट सोमय्या यांनी तक्रार देत चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणात ईडीने मुंबईसह अहमदाबाद येथे सात ठिकाणी छापे टाकून 13.50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. आता किरीट सोमय्या यांनी ट्विट करत हे संपूर्ण प्रकरण व्होट जिहादशी संबंधित असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. मालेगाव व्होट जिहाद घोटाळा (Malegaon Vote Jihad Scam) 1000 कोटींचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत देखील 'व्होट जिहाद'चा मुद्दा चर्चेत आला होता. या मुद्द्याला विरोध करण्यासाठी भाजपने एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. विधानसभेच्या निकालानंतर मालेगाव व्होट जिहादप्रकरणी ईडीकडून सात ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.


 






5 आरोपींना अटक, सात फरार


किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, मालेगाव व्होट जिहाद या घोटाळ्यात 6 डिसेंबर रोजी ईडीने पुन्हा एकदा मुंबई, अहमदाबाद येथील सात ठिकाणी छापे मारले. यात साडे तेरा कोटी रुपयाची रोकड जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज मोहम्मदच्या खात्यात एक हजार कोटी रुपये जमा झाले. यात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सात आरोपी फरार असल्याचे त्यांनी म्हटले होते.  


 






किरीट सोमय्या उद्या मालेगावात येणार


या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या उद्या मालेगाव दौऱ्यावर येणार आहेत. ते तक्रारदारांसोबत 'भोजन पे चर्चा' करणार आहेत. तसेच नामको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, अपर पोलीस अधीक्षकांचीही सोमय्या भेट घेणार आहेत.   गेल्या महिन्यात 13 नोव्हेंबरला किरीट सोमय्या यांनी मालेगावला भेट दिली होती. आता किरीट सोमय्या उद्या मालेगावात येऊन काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर