Vaijapur Rohit Pathare Case : वैजापूरमध्ये रोहित पठारेला निर्घृणपणे संपवलं, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न; आरोपींना कोर्टात नेताना मोठा गोंधळ
Rohit Pathare Crime News : जुन्या वादातून रोहित पठारे नावाच्या तरुणाला तलवार, कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने वार करून निर्घृणपणे संपवलं. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात जुन्या वादाचा राग मनात ठेवून रोहित पठारे नावाच्या तरुणाला तलवारी, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीने अत्यंत निर्घृणपणे संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण वैजापूर शहर हादरून गेलं असून, संतप्त नातेवाईक आणि भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून आरोपींच्या अटकेसाठी तीव्र निदर्शने केली. पोलीस ठाण्यासमोर झालेला आत्मदहनाचा प्रयत्न आणि आरोपींना न्यायालयात नेताना झालेला गोंधळ यामुळे परिसरातील वातावरण प्रचंड तापले आहे.
या प्रकरणात संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्तीचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर तीव्र सवाल उपस्थित केले आहेत. उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाल्यानंतर वैजापूरमध्ये तणावपूर्ण शांतता पसून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आणि प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.
Yeola Road Attack : येवला रोडवर दोन गट आमनेसामने
वैजापूरच्या येवला रोडवर 31 ऑक्टोबर रोजी दोन तरुणांच्या गटात जुन्या वादातून तुफान हाणामारी झाली. या संघर्षात विरोधी गटाने तलवारी, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडींसारख्या प्राणघातक हत्यारांचा सर्रास वापर केला. या भीषण हल्ल्यात रोहित पठारे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि 3 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला.
Police Station Tension : पोलिसांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न आणि 4 तास महामार्ग जाम
रोहितच्या मृत्यूची बातमी शहरात पोहोचताच नातेवाईकांचा आणि मित्रपरिवाराचा संताप अनावर झाला. मंगळवारी रात्रीपासून नातेवाईकांनी वैजापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. याच दरम्यान एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच मध्यस्ती केल्याने मोठा अनर्थ टळला.
त्यानंतर बुधवारी संतप्त नातेवाईक आणि भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात तब्बल 4 तास जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. 'आरोपींना तात्काळ अटक करा आणि फाशी द्या' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
Sanjay Shirsat Visit : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर कुटुंबीयांचा आक्रोश
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. या वेळी रोहितच्या कुटुंबीयांनी अश्रूंना वाट मोकळी करत, "पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली आणि आरोपींना पाठीशी घातले," असा गंभीर आरोप केला.
कुटुंबीयांचे आरोप ऐकल्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर आणि तपास पद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांची तातडीची मदत देण्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी केली.
Vaijapur Rohit Pathare Case : कोर्टात आरोपींवर धाव घेण्याचा प्रयत्न
या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, पकडलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेले जात असताना, बाहेर जमलेल्या संतप्त भीमसैनिकांनी आरोपींवर धाव घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे न्यायालय परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ आणि धावपळ उडाली. सध्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:






















