FDA Actions News: तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
Chhatrapati Sambhajinagar FDA Actions News: दिवाळीत अन्नपदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभागाने चार मोठ्या कंपन्यांवर छापा टाकलाय.

Chhatrapati Sambhajinagar FDA Actions News: दिवाळीत अन्नपदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) चिकलठाणा एमआयडीसी भागातील मसाले निर्मितीचा कारखाना, जाधववाडी मोंढ्यातील (Jadhavwadi Mondha) बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला, पंढरपूर येथील ओम श्रीनाथ इंडस्ट्रीज ऑईल रिपॅकिंग युनिट आणि जुना मोंढा येथील जय मिश्री ट्रेडर्स या चार मोठ्या कंपन्यांवर छापा टाकलाय. या कारवाईत 19 लाख 44 हजार 969 रुपयांचा तेलाचा साठा, तर 2 लाख 27 हजार 700 रुपयांचे मसाले आणि खोबऱ्याची पावडर असा एकूण 21 लाख 72 हजार 669 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पथकांनी केलेल्या तपासणीत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एल. एम. स्पायसेस मसाला उत्पादन कारखान्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणारी धणे पावडर आणि मिरची पावडर दिसून आली. कारखान्यात बनवलेले मसाले भेसळयुक्त आणि चुकीचे ब्रँड लावले असल्याचा संशय आल्याने भेसळयुक्त मसाल्यांचा 246 किलोचा साठा जप्त करण्यात आला. (Chhatrapati Sambhajinagar FDA Actions News)
दरम्यान, या मसाल्याची किंमत 98 हजार 400 रुपये असून तो संबंधित विक्रेत्याच्या सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला आहे. मसाल्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Jadhavwadi Mondha: जाधववाडी मोंढ्यातील जय मिश्री ट्रेडर्सवर छापा, 2,820 किलो संशयास्पद खाद्यतेलाचा साठा जप्त
दरम्यान, जाधववाडीतील बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला या दुकानाची तपासणी केल्यानंतर भेसळयुक्त असण्याची शक्यता असल्याने शिखर' ब्रँडची डेसिकेटेड कोकोनट पावडर असलेली 431 पाकिटे जप्त केली. याची किंमत लाख 29 हजार 300 रुपये एवढी आहे. तर जुना मोंढ्यातील जय मिश्री ट्रेडर्सवर छापा टाकून 2,820 किलो संशयास्पद खाद्यतेलाचा साठा जप्त केला. या तेलाची किंमत 5 लाख 36 हजार 329 रुपये आहे. तर दुसरीकडे पंढरपूरच्या ओम श्रीनाथ इंडस्ट्रीज या ऑईल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकून 14 लाख 8 हजार 640 रुपये किमतीचे 6,280 किलो संशयास्पद व चुकीचे बँडिंग असलेले रिफाइंड सोयाबीन व सूर्यफूल तेल जप्त केले.
Maharashtra FDA Actions News: राज्यातील सहा विभागांत धडक मोहीम
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहाही विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नष्ट करायचे अन्न पुन्हा बाजारात आणून ग्राहकांच्या ताटापर्यंत धोका पोहोचवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. नवरात्रोत्सवानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई, खवा, खाद्यतेल, सुकामेवा व फराळाच्या पदार्थांची मागणी वाढणार असल्याने एफडीएतर्फे धडक मोहीम राबवण्यात येणार आहे.























