मुंबई: चेंबूरमध्ये एका 17 वर्षीय मुलाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईश्वर मारवाडी असं मृत मुलाचे नाव असून, आरोपी शफीक शेख याने त्याची हत्या केली आहे. मृत मुलाचे पत्नीशी संबंध असल्याचा आरोपीला संशय होता आणि याच संशयातून आरोपीने मुलाच्या शरीराचे चार तुकडे करुन निर्घृण हत्या केली आणि शरीराचे तुकडे स्वतःच्या घरातच लपवून ठेवले. सदर प्रकरणी आरोपी शफीक शेखला आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.


चेंबुरमधील म्हाडा वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. शफी अहमद अब्दुल माजिद शेख (32)  या रिक्षाचालकाने  ईश्वर मारवाडी ऊर्फ ईश्वर ललित पुत्रान या 17 वर्षीय तरुणाची हत्या केली. त्याने मृतदेहाचे चार तुकडे केले आणि घरातच लपवले. मृत ईश्वर मारवाडी याचे चार तुकडे करण्यात आले असून त्याचे डोके, दोन हात कापण्यात आले होते. सोमवारी ही हत्या करून दोन पिशव्यांमध्ये हात आणि डोके तर शरीर एका कपड्याने बांधून ठेवलं होतं. आरोपीने मयताचे पाय कापण्याचा प्रयत्नही केला पण तो करू शकला नाही. 


आरोपी शफीक शेख याला आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृताचे त्याच्या पत्नीशी संबंध असल्याचा संशय आरोपीला आला आणि त्याने हा गुन्हा केला असल्याचा सूत्रांनी सांगितलं आहे.


मृत ईश्वर अनाथ असल्याने तो लहान असताना त्याची दया येऊन ललित पुत्रन यांनी त्याचा सांभाळ केला होता. ललित यांच्या एका मुलीचे लग्न हे आरोपी शफी अहमद याच्याशी 2020 साली झाले. मात्र शफीला ईश्वरचा स्वभाव खटकू लागला. ईश्वर आपली पत्नी आणि सर्वात लहान मेहुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याला संशय होता. त्याने या आधी ईश्वरला धमकी दिली होती. या संबंधी त्याने सासरे ललित पुत्रन यांनाही सांगितलं. 


दोन दिवसांपूर्वी शफीने ईश्वरला त्याच्या घरी बोलावले. त्या ठिकाणी दोघांमध्ये भांडणे झाली आणि शफीने त्याच्याकडील कोयता ईश्वरच्या मानेवर मारला. त्याचे हात, पाय आणि शीर धडावेगळे केले आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवले. ईश्वरचा शोध घेत असलेल्या शफीच्या सासऱ्यांना शफीवर संशय आला आणि त्यांनी शफीला त्याबद्दल विचारले. ईश्वरची हत्या करून त्याचे तुकडे करून किचनमध्ये ठेवल्याची कबुली शफीने दिली. 


ललित यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शफीच्या घरातील किचन तपासले असता त्यांना ईश्वरच्या शरीराचे भाग आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी शफीला अटक करून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.


ही बातमी वाचा: