Chandrapur News Update : वाढत्या इंधन दरांमुळे वाहनचालकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. परंतु, इलेक्ट्रिक वाहनांचा पेट्रोलवरील वाहनांपेक्षा वेग कमी आहे. त्यामुळे या वाहनांच्या विक्रिला थोडाफार फटका बसतो. परंतु, यामुळे वेग वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकच्या (E Bikes) बॅटरीत छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॅटरीत छेडछाड करणाऱ्या चंद्रपुरातील एका डीलरवर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. या डीलरकडून एक लाख 60  हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. याशिवाय तांत्रिक बदल केलेल्या दहा इबाइक देखील परिवहन विभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. परिवहन विभागाच्या या कारवाईमुळे छेडछाड करून इलेक्ट्रीक बाइकची विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 


पेट्रोलचे दर सध्या गगणाला भिडले आहेत. पेट्रोलच्या दरातील ही वाढ लक्षात घेता सध्या इलेक्ट्रिक बाइकला पसंती मिळू लागली आहे. पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून देखील सरकार अशा प्रकारच्या  वाहनांना चालना देत आहे. मात्र, सरकारने घालून दिलेली तांत्रिक नियमावली धुडकावून  वाहन विक्रेते बाईक विक्री करत आहेत.  


सरकारच्या नियमानुसार इलेक्ट्रिक बाइकचा वेग प्रतितास 25 किमी एवढाच असणे गरजेचे आहे. परंतु, या वेग मर्यादेमुळे अनेकदा ग्राहक या  बाइकबद्दल तक्रार करतात किंवा विकत घेण्याकडे पाठ फिरवतात. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक बाइकचा खप वाढविण्यासाठी बाइकच्या रचनेत बदल करून त्या वेगवान करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र वेग वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या या बदलामुळे गाड्यांना आगी लागण्याची शक्यता असते. गेल्या काही दिवसांमध्ये वाहनांना आगी लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती.  


ताशी 25 किलोमीटरची वेगमर्यादा
केंद्रीय मोटार नियम कायद्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेइकलची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. या व्याख्येनुसार बॅटरी वगळता या गाडीचे वजन 60 किलोंपेक्षा जास्त असू नये. शिवाय त्यांची वेगमर्यादा 25 किलोमीटर प्रतितास असावी आणि सोबतच ई बाईक्सची बॅटरी 250 वॅटची असावी असा दंडक आहे. या व्याख्येत बसणाऱ्या गाड्यांनाच लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज नसते. या शिवाय त्यांना शंभर टक्के कर सवलत देखील देण्यात आली आहे. असे असताना विक्रेत्यांकडून खप वाढवण्यासाठी त्यांच्या रचनेत बदल केले जात आहेत. परंतु, अशा बदलांमुळे गाड्यांना आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. गाडीच्या रचनेत बदल करणे म्हणजे एक प्रकारे चालकाच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे.  


परिवहन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक 
प्रमुख शर्तींचा भंग किंवा बाइकच्या रचनेत बदल केल्यास बाइकची परिवहन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते, अशी माहिती चंद्रपूरचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी दिली आहे. केंद्रीय मोटार नियम कायद्याच्या व्याख्येनुसार जरी इ बाईक्स निर्माण करणाऱ्या कंपनींकडून बाईक्सची निर्मिती होत असली तरी डीलर्सकडून वेग वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या या बदलामुळे इ बाईक्स धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी परिवहन विभागाने ई बाईक्स विरोधात धडक कारवाई सुरू ठेवणे आवश्यक आहे, अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.  


महत्वाच्या बातम्या


OlA Electric Scooter पुन्हा वादात, कमी-स्पीड राइडिंग दरम्यान झाले दोन तुकडे; फोटो व्हायरल


Ola Scooter मिळत आहे मोफत! मात्र करावे लागेल हे काम, भाविश अग्रवाल यांचे ट्वीट