Navneet Rana Arrest Matter : अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीची दखल घेत लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांना समन्स बजावले आहे. समितीने त्यांना 15 जून रोजी समितीपुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. विशेषाधिकार समितीने महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि भायखळा कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास यांनाही समन्स बजावले आहे.
हनुमान चालिसा प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक झाला होती. यानंतर आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार करत नवनीत राणा यांनी लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची दखल घेत राज्यातील बड्या अधिकाऱ्यांना तोंडी पुराव्यांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी 23 एप्रिल रोजी अटक केली होती. तत्पूर्वी, राणा दाम्पत्याने मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या अटकेनंतर या जोडप्याला 4 मे रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
अटक प्रकरणी नवनीत राणा यांनी 23 मे रोजी समितीसमोर आपली बाजू मांडली होती. त्यानंतर आज समितीने महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि भायखळा कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास यांनाही समन्स बजावले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही नाव
दरम्यान, 23 मे रोजी लोकसभेच्या हक्कभंग समितीने या प्रकरणी नवनीत राणा यांची साक्ष नोंदवली होती. यावेळी राणा यांनी आरोप केलेल्या सर्व अधिकाऱ्यांना या समितीने समन्स बजावले आहे. साक्ष नोदंवत असताना नवनीत राणा यांनी मराहाष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचीही नावं या समितीसमोर घेतली होती. यामध्ये शिवेसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांच्या नावांचा देखील समितीसमोर उल्लेख केला होता.