Chandrapur Crime News चंद्रपूर : मध्यप्रदेशातून दारूबंदी असलेल्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात जाणारा अवैध दारूसाठा चंद्रपूर पोलिसांच्या (Chandrapur Crime) गुन्हे शाखेने हस्तगत केलाय. या कारवाईत तब्बल 39 दारुच्या पेट्यांसह एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत ही कारवाई करण्यात आली असता यात मुरमुऱ्यांच्या पोत्यात दारुचा साठा आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपूरातील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस (Chandrapur Police) स्टेशन कडे सोपवण्यात आला आहे.


चक्क मुरमुऱ्यांच्या पोत्यातून अवैध दारूची तस्करी


गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र जिल्ह्यात इतर अनेक भागातून अवैध दारूची छुप्या पद्धतीने वाहतूक केली जाते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गडचिरोली पोलिसांनी अनेकदा या दारू तस्करांचा छुपा अजेंडा हाणून पाडला आहे. असे असताना अनेकदा नवनवीन शक्कल लढवत हे दारू तस्कर छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करून कधीक नफा कमावण्याच्या प्रयत्नात असतात. अशाच एका छुप्या कारवाईची माहिती चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. यात मध्यप्रदेशातून एक वाहन मुरमुऱ्यांच्या पोत्यात मोठ्या प्रमाणात दारुचा पुरवठा करत असून हा सर्व माल दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नेला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत या वाहनाची अडवणूक केली. त्यावेळी या वाहनातील दोन संशयितांना विचारपुस केली असता, त्यांनी आधी उडवा उडावीचे उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष वाहनाची झडती घेतली असता, त्यात मुरमुऱ्यांच्या पोत्यात तब्बल 39 दारुच्या पेट्या आढळून आल्या. 


39 दारुच्या पेट्यासह दोघांना घेतले ताब्यात 


चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सोबतच 39 दारुच्या पेट्यासह एकूण दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या कारवाई मागे काही मोठे मासे असल्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


तीस वर्षांपासून जिल्ह्यात दारू बंदी 


गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून दारूबंदी अमलात असून 2016 पासून महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात दारू आणि तंबाखू नियंत्रण पथदर्शी प्रयोग "मुक्तिपथ" या नावाने राबवत आहे. जिल्ह्यातील 1100 गावातील लोकांनी आणि त्यात प्रामुख्याने स्त्रियांनी दारूबंदीचे समर्थनार्थ सरकारकडे प्रस्ताव दिलेले आहे. 700 पेक्षा जास्त गावांनी त्यांच्या गावात बेकायदेशीर दारू विक्री बंद पाडली आहे. शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांनी पन्नास हजार पेक्षा जास्त पुरुषांनी दारू सोडली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या