हिंगोली : फ्युचर इंडिया बँकेत गृहकर्ज मंजूर करण्याचे आमिष देत एका शिक्षकाला 25 लाख 76 हजार रुपयाला फसवल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरमध्ये उघड झाला आहे.  याप्रकरणी आता आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आखाडा बाळापूर येथील एका शाळेत शिक्षक असलेल्या विजय केशव कदम यांना जानेवारी महिन्यात एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने नाव कृष्णकांत सुरी असे सांगितले. सुरी यांनी फ्युचर इंडिया कंपनीचे वीस लाख रुपयाचे लोन तुम्हाला मंजूर  करून देतो असे म्हटले. ओळख पटण्यासाठी समोरील व्यक्तीने कदम यांना स्वतःचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड चे फोटो देखील व्हाट्सअपवर पाठवली. या ओळखपत्रावरून कदम यांना समोरील व्यक्तीवर विश्वास बसला आणि त्यांनी पहिल्या वेळी 34 हजार रुपये तर दुसऱ्या वेळी 76 हजार रुपये आरटीजीएसद्वारे बँकेतील खात्यामध्ये जमा केले.  त्यानंतर भामट्याने कदम यांना एकूण 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होत आहे.  आता जास्त पैसे लागणार आहेत त्यामुळे तुम्ही परत पैसे पाठवा असे सांगितले.  त्यावरून कदम यांनी त्याच खात्यामध्ये वारंवार अनेक वेळा पैसे पाठवत गेले तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमचं गृहकर्ज लवकरच मंजूर होईल आणि पैसे थेट तुमच्या खात्यात येतील असा विश्वास सुद्धा समोरील भामट्याने कदम यांना दिला आहे. आतापर्यंत कदम यांनी एकूण 25 लाख 76 हजार रुपयांची रक्कम भरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे.  आपल्याला समोरील व्यक्तीने गंडवले आहे झालेला प्रकार लक्षात येताच विजय कदम यांनी गुरुवारी रात्री बाळापुर पोलिसात तक्रार दाखल केली.


यावरून मध्य प्रदेशातील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड आणि उपनिरीक्षक बालाजी पुंड हे आता याप्रकरणी तपास करत आहेत.  पाठवलेल्या आधार कार्डमध्ये फोटो दुसऱ्या व्यक्तीचा आणि आधार कार्ड तिसऱ्याच व्यक्तीची असल्याचे पोलीस तपासात सुद्धा निष्पन्न झाला आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर ही एक नवं आव्हान असणार आहे.


अशाच पद्धतीने वेगवेगळे आमिष देत लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी ही सक्रिय झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने आमिष  देणे त्याचबरोबर फोन कॉल करून वेगवेगळ्या ऑफर सांगणे या माध्यमातून लोकांना पैसे बँक अकाउंटमध्ये पाठवायला सांगतात किंवा ऑनलाईन पद्धतीने पाठवायला सांगतात त्यामुळे सामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक होते. त्यामुळे अशा भामट्या लोकांवर विश्वास न ठेवता कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असेच आवाहन करण्यात आले आहे.