Bengaluru Rave Party News : कर्नाटकमधील बेंगळुरुमध्ये हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचं प्रकरण समोर आलेय. एका फार्महाऊसवर केंद्रीय गुन्हे शाखने अचानक धाड टाकली, पण समोरची परिस्थिती पाहून पोलिसही चक्रावले. रेव्ह पार्टीमध्ये कोकेन-ड्रग्ज तर होतेच. पण धक्कादायक बाब म्हणजे, 25 मुलींनाही पार्टीसाठी बोलवलं होतं. गुन्हे शाखेनं 100 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये 25 मुलींचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, रेव्ह पार्टीमध्ये तेलगु अभिनेत्री हेमा आणि देवरा फेम अभिनेता श्रीकांत याचाही समावेश होता. त्यांना अटक केल्याच्या चर्चा सुरु आहेत. श्रीकांत आणि हेमा यांनी या वृत्ताचं खंडन केले आहे.
25 मुलींचा सहभाग -
बेंगळुरू येथील फार्महाऊसवर आयोजित केलेल्या 'रेव्ह पार्टी'वर केंद्रीय गुन्हे शाखेने छापा टाकला. या छापेमारीत 'एक्स्टसी' गोळ्या, कोकेन आणि इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. रेव्ह पार्टीचे दृश्य पाहून गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिसही थक्क झाले होते. फार्महाऊसमधून विचित्र आवाज ऐकू आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने रविवारी पहाटे बेंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील एका फार्महाऊसवर छापा टाकला. फार्महाऊसमधून 17 MDMA गोळ्या आणि कोकेनसह इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या रेव्ह पार्टीला आंध्र प्रदेश आणि बेंगळुरूमधील 100 हून अधिक लोक उपस्थित होते, त्यात 25 हून अधिक मुलींचा समावेश होता.
वाढदिवसाला ठेवली होती पार्टी -
या रेव्ह पार्टीबाबात पोलिसांनी सांगितले की, 18 मे रोजी सायंकाळी 5 ते 19 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत रेव्ह पार्टी सुरु होती. हैदराबादच्या वासूने वाढदिवस साजरा करण्यासाठी या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये आंध्र प्रदेशच्या आमदाराचा पासही सापडला. याशिवाय 15 हून अधिक आलिशान गाड्याही उभ्या होत्या. एका दिवसात पार्टीवर 50 लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महागड्या गाड्याही जप्त
रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असणाऱ्यांमध्ये डीजे, मॉडेल, अभिनेता आणि इतर दिग्गज लोकांचा सहभाग होता. रेव्ह पार्टीमध्ये तेलगू अभिनेत्री हेमा आणि अभिनेत्री श्रीकांतही होता. ज्या फार्महाऊसवर रेव्ह पार्टीचं आयोजन केले, त्याच्या मालकाचे नाव गोपाळ रेड्डी आहे. गुन्हे शाखेनं केलेल्या छापेमारीमध्ये फार्म हाऊसजवळ मर्सिडीज-बेंज आणि ऑडीसह 15 पेक्षा जास्त लग्जरी गाड्या जप्त करण्यात आल्यात.
दरम्यान, बेंगळुरूमध्ये याआधीही रेव्ह पार्टीची प्रकरणं समोर आली आहेत. अनेक हायप्रोफाईल लोकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील एका रेव्ह पार्टीदरम्यान पोलिसांनी छापा टाकला होता. जिथं काही जण अश्लिल व्हिडीओचं शूटिंग करत होते. पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या होत्या.