कोल्हापूर/छत्रपतीसंभाजीनगर : मॉन्सूनपूर्व पावसाने आज कोल्हापूरसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटामध्ये वादळी पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यात आज वादळी पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. विजांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. 


जोतिबा रोडवर हॉटेल साम्राज्य शेजारी एक भलं मोठं झाड चार चाकीवर येऊन कोसळले. या वाहनामध्ये पाच ते सहा भाविक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान याच रोडवरती जवळपास सात ते आठ झाडे वादळामध्ये पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कसबा बावडा ते वडणगे रस्त्यावर सुद्धा झाडांसह वीजेचे खांब वादळामुळे मोडून पडले आहेत. वडणगे स्मशानभूमीचे छतही सुद्धा उडून गेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. 


छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात जोरदार पाऊस


दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिला.करमाड, शेकटा,आणि करंजगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. बिडकिन शिवारात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांच्या पपई च्या बागाना बसला असून हे पीक आडवे झाले आहेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.उन्हाळी पिकांना देखील याचा मोठा फटाका बसला आहे. 


अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच उकाडा मात्र कायम आहे. दरम्यान, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या