मुंबई : 'बुलीबाई' या अ‍ॅपच्या (Bulli Bai App Case) माध्यमातून महिलांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत या तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज वांद्रे दंडाधिकारी न्यायालयानं गुरूवारी फेटाळून लावला आहे. या सर्व आरोपींच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं जोरदार विरोध केला होता.


बुलीबाई या अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू होते. या महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरुन ही माहिती आणि त्यांचे फोटो चोरी करत इथं टाकण्यात येत असत. अशा 100 हून अधिक महिलांचे फोटो इथं टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचं तपासांत समोर आलं आहे. त्याविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं मुंबईत एफआयआर दाखल करत पुढील तपास सुरू केला होता. त्यानंतर प्रथम विशाल कुमार झा आणि 5 जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली. या तिघांनीही न्यायालयीन कोठडी मिळताच त्यांनी वांद्रे येथील दंडादिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.


कोविडच्या संसर्गामधून बरे झाल्यानंतर विशाल झा याला रविवारी आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले आहे. श्वेता सिंह (18) ही दुसरी आरोपी सध्या भायखळा महिला कारागृहात असून तिसरा आरोपी मयंक रावत (21) यालाही कोरोनाची लागण झाल्यानंतर कलिना इथं कैद्यांसाठीच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. मंगळवारी सरकारी वकिलांनी तिघांच्याही जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. जाणीवपूर्वक अनेक बनावट ट्विटर खात्यांद्वारे खोटी ओळख वापरून त्यांनी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. आपली खरी ओळख लपवताना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'प्रोटॉन मेल'चा वापर केला. या अॅपचा निर्माता निरज बिश्नोईला लवकरच ताब्यात घेऊ आणि त्यानंतर झा आणि बिश्नोई या दोघांचीही समोरासमोर चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही मुंबई पोलिसांनी न्यायालयाला दिली. त्यांची ही बाजू ग्राह्य धरत न्यायालयानं या जामीन अर्जांवरील आपला निकाल जाहीर करत या तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले.


इतर महत्त्वाच्या बातम्या :