Buldhana Crime : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून चार साधूंना सांगलीतील जत तालुक्यात मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडला. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे काल (14 सप्टेंबर) सायंकाळी लहान मुले चोरणारी महिला समजून एका तृतीयपंथियाला (Transgender) जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाण प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक केली आहे. तर तीन जण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.


सायरा नावाची तृतीयपंथी अकोट येथील फॅशन शो बघून मलकापूरकडे परत जात होती. जळगाव जामोद येथील जुना बस स्टँड परिसरात जमावाने मुले चोरणारी टोळीतील महिला समजून या तृतीयपंथियाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर जमावाने या तृतीयपंथियाला मारहाण करत पोलीस स्टेशनमध्ये नेलं. चौकशी केली असता या तृतीयपंथियाचा मुले चोरणाऱ्या टोळीशी संबंध नसल्याचं समोर आलं. आता या तृतीयपंथियाने जळगाव जामोद पोलिसात तक्रार देऊन मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी आतापर्यंत व्हिडीओत दिसणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलं असून इतर मारहाण करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान सायराला बेदम मारहाण केल्यामुळे तिला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


तर राज्यभरातील तृतीयपंथी जमावाला धडा शिकवेल : मोगराबाई किन्नर, तृतीयपंथीयांचे नेते
मुले पळवणारी बाई म्हणून तृतीयपंथीला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा तृतीयपंथियाचे नेते मोगराबाई किन्नर यांनी निषेध केला आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सगळ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील तृतीयपंथीय याचा निषेध करत जळगाव जामोद येथे जमतील आणि या जमावाला धडा शिकवेल, असाही इशारा तृतीयपंथीय यांचे नेते मोगराबाई किन्नर यांनी दिला आहे.


सीमेलगत मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा
दरम्यान मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चा आहे. या परिसरात पालक आणि लहान मुलांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. प्रशासनाने तात्काळ याविषयी खुलासा आणि जनजागृती करावी, याविषयी माहिती जनतेला द्यावी अन्यथा अशा घटना घडतच राहतील अशी शक्यता नाकारता येत नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या