मुंबई : बोरिवली (Borivali) जीआरपी पोलिसांनी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असल्याची माहिती समोर आलीये. या प्रकरणात बोरीवली जीआरपी पोलिसांनी तिघांना अटक केलीये. यावेळी  जीआरपी पोलिसांनी 2 महिन्याच्या बाळाची सुटका करुन त्याच्या पालकांच्या ताब्यात त्याला दिले. काही दिवसांपूर्वी बोरीवली रेल्वे स्थानकावरुन एक दोन महिन्याचे बाळ चोरीला गेले होते. ते बाळ आत्माराम शशिकांत आजगावकर यांच्याकडे सापडले. त्याच मुलाच्या बारश्या दिवशी पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि बाळाला ताब्यात घेतले. 


या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आलम अब्बास काशिफ शेख उर्फ ​​राजा वय 22 वर्ष, सय्यद हैदर मेहेंदी आणि आत्माराम शशिकांत आजगावकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी आत्माराम शशिकांत आजगावकरला मागील 11 वर्षांपासून मूल होत नव्हते. पण त्याला हे मूल भेटल्यानंतर त्याने नातेवाईकांना पेढे वाटले. आजगावकर याने या मुलाचा नामकरण समारंभाचा देखील कार्यक्रम ठेवला होता. त्यापूर्वी पोलिसांनी घटनास्थळ गाठून रॅकेटचा पर्दाफाश केला. 


नेमकं काय घडलं?


बोरिवली रेल्वे स्थानकावरुन दोन दिवसांपूर्वी दोन महिन्याच्या लहान बाळाची चोरी झाली होती. पण चार दिवसांतच पोलिसांनी या बाळाची सुखरुप सुटका देखील केली. शनिवार 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री बोरीवली स्थानकावरुन या बाळाची चोरी झाली. त्यानंतर त्या बाळाचा पालकांनी पोलिसांत तात्काळ तक्रार केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तुटपुंज्या माहितीवर संशयित इसम बाळाला घेऊन सुरुवातीला जोगेश्वरी आणि नंतर गोवंडी परिसरात गेल्याचं निदर्शनास आलं. पण तिथेही पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. 


दीड लाखात बाळ विकलं 


सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी पुण्याला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर त्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानकावरुन अटक करण्यात आली. आलम अब्बास काशिफ शेख उर्फ ​​राजा याला अटक केल्यानंतर त्याने या गुन्ह्यातील इतर आरोपींचा उलगडा केला. बदलापूरला राहणाऱ्या आजगावकर जोडप्याला लग्नाला 11 वर्ष झाली तरी मूल नव्हते. त्यामुळे या आरोपीने आजगावर कुटुंबाला दीड लाखात बाळ देण्याचं आश्वासन दिलं. राजा आणि सय्यद हे आजगावरचे मित्र होते आणि या तिघांनी मिळून ही प्लॅनिंग केली होती. 


आजगावकर कुटुंबा तयार होताच राजाने रेकी करण्यास सुरुवात केली.  बोरीवली रेल्वे स्थानकावरील एका महिलेचं बाळ आपण चोरी शकतो अशी खात्री होताच त्याने दोन दिवस पाळत ठेवली होती. त्यानंतर 17 डिसेंबरच्या मध्यरात्री महिला झोपलेली असताना बाळ घेऊन तो पसार झाला. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी बाळाची सुखरुप सुटका करण्यात आली आणि पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. 


हेही वाचा : 


Yavatmal Crime News : नायब तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला रिव्हॉल्वरसह अटक; खनिज तस्करांच्या कारवाईतून केला होता हल्ला