Nagpur News नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या गणेश पेठ बस स्टँड जवळील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी वजा सूचना पोलिसांना मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर दक्षता म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी तपासणी सुरू केली आहे. पोलिसांसह बीडीडीएसचे पथक आणि अग्निशमन दल ही त्या ठिकाणी तपासणी करत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, हॉटेल द्वारकामाईमध्ये एकूण 39 रूम्स आहेत. त्यापैकी आज 14 रूम्सची पाहणी करून ताबा घेण्यात आला आहे. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे ई-मेल द्वारे द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी वजा सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तातडीने हॉटेलमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली आहे. हॉटेलच्या एकूण चार फ्लोर पैकी दोन फ्लोरची तपासणी बीडीडीएस पथकाने केल्याची माहिती आहे. मात्र अद्याप काहीही संशयास्पद सापडलेलं नाही. तर सध्याघडीला आणखी दोन फ्लोरची तपासणी होणे बाकी आहे. मात्र या बॉम्ब ठेवल्याच्या धमकी वजा सूचनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस नेमकं काय म्हणाले?
द्वारकामाई हॉटेलमध्ये हॉटेलच्या मॅनेजमेंटला पहाटे पावणेतीन वाजता हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल आला. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानं पोलिसांना सूचना दिली. धमकीचा ई-मेल अत्यंत गांभीर्याने घेत पोलिसांनी सकाळपासूनच हॉटेलमध्ये कसून तपासणी सुरू केली आहे. संपूर्ण हॉटेल तपासल्यानंतर आतापर्यंत काहीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद सापडलेलं नाही. दक्षता म्हणून पोलीस पुन्हा एकदा हॉटेलची कसून तपासणी करणार आहे. तसेच हॉटेलला धमकीचा हा ई-मेल कोणी आणि का पाठवला? याची चौकशीही सुरू करण्यात आली असल्याचे माहिती नागपूर क्राइमचे डीसीपी राहुल माकणीकर यांनी दिली आहे.
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा
शहरात विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवांचे कॉलमुळे विमान प्रशासनाला हैराण करून सोडल्याची घटना मागील काही दिवसात घडली. त्यातच काही दिवसांपुर्वी इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या विमानात बाॅम्ब ठेवल्याचा मेसेज सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अफवा पसरविल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून सोशल मिडिया खातेधारकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा