Maharashtra Winter Session 2024 नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता बदल झाला नसला, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे. नागपूरातील रामगिरी म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या आणि देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या  शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशदारावर हे सत्ता केंद्र बदलाचे दृश्य प्रकर्षाने जाणवत आहे. रामगिरी बंगल्याचे प्रवेशद्वारावर कालपर्यंत असलेली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची पाटी काढून नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. तर देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांच्या नावाऐवजी आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदल झाले नसले, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे आणि तेच नागपुरात रामगिरी आणि देवगिरी या दोन शासकीय बंगल्यांच्या प्रवेशद्वारावर दिसून येत आहे.


विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार?


हिवाळी अधिवेशनाच्या तारखा समोर आल्याने त्या अनुषंगाने नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारीला वेग आला आहे. दरम्यान, अधिवेशनात विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार? हा प्रश्न या निमित्याने आता विचारला जाऊ लागला आहे. नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधीपक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याचे सजावटीचे काम सुरू आहे. मात्र आवश्यक असलेले संख्याबळ विरोधी पक्षाकडे नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बंगल्याच्या सजावटीचे काम सुरू आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांसाठी आरक्षित असलेला बंगला कोणाला मिळणार याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  


कधी होणार हिवाळी अधिवेशन?


राज्यातील नवनिर्वाचित २८८ आमदारांचं सरकार स्थापन झाल्यानंतर १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. पण अद्याप सरकार स्थापन न झाल्याने २८८ आमदारांना एकत्र बोलवत सत्ता स्थापनेचं एक अधिवेशन मुंबईला होणार आहे. यासाठी २८८ पैकी ७८ हे पहिल्यांदा विधानसभेत पोहचले आहे. त्यात भाजपचे ३३, शिंदे गट शिवसेना १४, अजित पवार गट राष्ट्रवादी ८, ठाकरे शिवसेना १०, कांग्रेस ६, शरद पवार गट राष्ट्रवादी ४ व इतर ३ आमदारांचा समावेश आहे.


संबंधित बातमी: