छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणाच्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे मात्र हे सोडलेले पाणी ज्या कालव्यांचे रोटेशन पूर्ण झालेले आहे, ते कालवे मुरुम टाकून बंद करण्यात आले आहेत. याचमुळे शेतकरी आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होत आहेत. सेलूतील नंबरच्या वरखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याच्या बंद केलेल्या पाण्यावरून पाथरीचे माजी आमदार यांचा मुलगा गोविंद वडीकर आणि कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांच्यातही फोनवरून जोरदार वादावादी झाल्याचे ऑडियो क्लिप द्वारे समोर आले आहे.
दोघांच्या संभाषणातील एक ऑडियो सध्या वायरल होत आहेत ज्यात गोविंद वडीकर यांच्याकडून बंद केलेलं पाणी पुन्हा सोडण्यासाठी कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना धमकावण्यात आले आहे. तुम्ही पाणी बंदच कसे केले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे होत आहे. पाणी सोड, मी खुप अधिकारी बघितले आहेत. त्यांच्या बदल्याही केल्या आहेत. माझ्याकडे बंदूक पण आहे, अशाप्रकारे गोविंद वडीकर हे आकात यांना धमकावत असल्याचे या ऑडियो क्लिप मधून समोर आले आहे. आकात हे मला वरिष्ठांचा आदेश आहे, तुम्ही त्यांना बोला, असे म्हणत आहेत. मात्र, वडीकर ऐकायला तयार नाहीत. मी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर यांनाही बोलतो. ते एका मिनिटात माझा फोन उचलतात, असेही वडीकर आकात यांना म्हणत आहेत. या व्हायरल झालेल्या या ऑडियो क्लिपची पुष्टी 'एबीपी माझा' करत नाही.
नेमकं काय संभाषण झालं?
गोविंद वडीकर यांनी कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी म्हटले की, मी माझी आमदार वडीकर साहेबांचा मुलगा बोलताय संभाजीनगरवरुन. तुम्ही ते 54 चारीचं पाणी बंद केलं, तिकडे आमचा 10-12 एक ऊस आहे, तो जळून चाललाय. त्यावर कृष्णा आकात यांनी सांगितले की, 54 चारी नेहमी चालू असल्यामुळे सगळ्या चाऱ्यांमध्ये मुरुम टाकलाय आपण. त्यावर गोविंद वडीकर यांनी आकात यांना, तुमच्याकडे लेखी आदेश आहे का?, असे विचारले. तेव्हा आकात यांनी वरिष्ठांची तोंडी सूचना हादेखील आदेशच असतो, असे म्हटले. त्यामुळे गोविंद वडीकर चांगलेच संतापले. त्यांनी म्हटले की, मी उद्या अधीक्षक अभियंत्यांना भेटतो. तुमच्या गेल्या चार-पाच वर्षांपासून खूप तक्रारी आहेत, आकात साहेब. मी आमदाराचा मुलगा आहे. तुम्ही सहकार्य करा, तुम्ही लोकांचे ऊस जाळू नका. उद्या मी तिकडे 50 पोरं घेऊन येतो. तुम्हाला लोकं कॅनॉलमध्ये ढकलून देतील. चार वर्षांपूर्वी तुम्हाला पोलीस संरक्षण घ्यावे लागले होते ना. मी तिकडे आल्यावर माझ्याकडं रिव्हॉल्व्हर असते, मी दम धरणारा नाही, असे गोविंद वडीकर यांनी म्हटले.
त्यावर कृष्णा आकात यांनी वडीकर यांना ठणकावून उत्तर दिले. आम्हाला साहेबांनी जो आदेश दिला आहे, त्याप्रमाणे आम्हाला करावे लागते. मला तुम्ही वरिष्ठांचा आदेश आणून द्या. तुम्ही माझी बदली कुठे गडचिरोलीला करणार ना?, असे त्यांनी म्हटले. त्यावर गोविंद वडीकर आणखी संतापले. मेघना बोर्डीकर आमचं जिल्ह्यातील लोकांचं पाहतील की तुमच्यासारख्या बाहेरुन आलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे पाहतील. तुम्ही मला उद्या रोखून दाखवा, असे त्यांनी म्हटले. मी तुझी बदली नाही तुला सस्पेंड करेन. माझं चॅलेंज आहे. मी चार आमदार खिशात घेऊन फिरतो. आमदार राजेश विटेकर एका मिनिटांत माझा फोन उचलतात, म्हणतात, बोला गोविंदराव. तुम्ही शेतकरी आहे, लोकांना 15 दिवस पाणी बंद करता का?, असे गोविंद वडीकर यांनी म्हटले.
कृष्णा आकात यांनी यावर पुन्हा एकदा गोविंद वडीकर यांना उत्तर दिले. तुमचे वडील माजी आमदार होते. जलसंपदा खात्याची प्रॉपर्टी असते, त्याची एक समिती असते. त्या समितीचा अध्यक्ष जलसंपदा मंत्री असतो. तुम्ही आम्हाला एवढं दाबताय ना, तुम्ही हीच हिंमत संभाजीनगरला धरणावर दाखवली तर तुमच्या शेतात पाणी-पाणी होऊन जाईल. तुम्ही कोणालाही फोन लावला तर मी सामान्य माणूस आहे, मी माझ्या परीने माझ्यासाठी काय करायचं ते करेन, असे कृष्णा आकात यांनी म्हटले.
त्यावर गोविंद वडीकर यांनी म्हटले की, तुम्ही स्वत:चं नुकसान करु नका. तुम्ही आमदाराच्या मुलाला शिकवणार का? तुमच्यासारखे 50 लोक मी कामाला लावलेत. तुमच्यासारखा चतुर्थश्रेणी कर्मचारी मला शिकवणार का? मी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचं ऐकत नसतो. तुझी-माझी काय रेंज आहे. तुम्ही मला जास्तच दीडशहाणे दिसता. आता मी तुमचाच कार्यक्रम लावतो, लिहून घ्या लिहून. दोन महिन्यांनी, सहा महिन्यांनी लावेन, पण लावेन. लीडरच्या समोरून आणि गाढवाच्या समोरुन जाऊ नये, असे म्हणतात. तुम्ही उद्या फक्त पाणी सोडू नका. मग दाखवतो आमदाराचा पोरगा काय करु शकतो, ते दाखवतो. औकातीत राहायचं, 15 हजार पगार आहे ना, ठेव फोन, उद्या दाखवतो तुला, असे गोविंद वडीकर यांनी म्हटले.
आणखी वाचा