सोलापूर: एका महिलेला नग्न फोटो पाठविल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत आपल्यावरील आरोपांना जोरदार उत्तर दिले. माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही . मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळया बाहुल्या बांधत आलेत . मात्र, जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात शनिवारी रात्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) बोलत होते. या कार्यक्रमात गोरे यांनी मोहिते पाटील यांना दे धक्का करीत पिलीव येथील जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते आणि मोहिते गटाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये (BJP) प्रवेश दिला. यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते.
या कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी तुफान फटकेबाजी केली.अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज नदीकिनारी जाऊन पूजा घालत आहे, काळ्या बाहुल्या रोवतंय. साध्या घरातलं पोरगं, आमदार तीनवेळा झालं. एक निवडणूक अशी झाली नाही, माझ्यावर केस झाली नाही. पण कधीही मी थांबलो नाही. कितीही आडवं या, कितीही दाबायचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा. पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या मागे जनता आहे, तोपर्यंत तुम्ही जयकुमार गोरेचं कधी वाकडं करु शकत नाही. कोणाचं वाईट केलं नाही, तर कधीच वाईट होत नाही. जो वाईट करतो, त्याचं चांगलं होत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा. आज जास्त बोलणार नाही. राज्यातील सर्वात दुष्काळी जिल्हा असणारा माण-खटाव पट्ट्यात हा पठ्ठ्या जन्माला आला आहे. माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे. माण-खटाव तालुका आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या 32 दिवसांत शेतीचं पाणी तुमच्या बांधावर येईल हे लक्षात ठेवा, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
सावज टप्प्यात आलंय, विरोधकांना सूचक इशारा
जयकुमार गोरे या कार्यक्रमात काहीतरी नक्की बोलणार अशी लोकांची अपेक्षा होती. त्यानुसार गोरे यांनी या सर्व प्रकरणावर सडकून टीका करत मला ज्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला माझ्या विरोधात काळया बाहुल्या बांधल्या त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. एक साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झाले हे ज्यांना पाहवत नाही अशी ही मंडळी असून माझी एकही निवडणूक झाली नाही. निवडणूक आली की माझ्यावर केसेस होणे ही दर वेळची गोष्ट बनली आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेलाही आता याची सवय झाली असून ते म्हणतात कितीही केसेस होऊ द्या असे सांगत गोरे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. अडवून अडवून गडी पडलं, अडवून अडवून गडी दमलं, पण मी कधी थांबलो नाही, असा टोलाही गोरे यांनी लगावला.
मी कोणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा. आज जास्त बोलणार नाही, असा इशारा गोरे यांनी दिला. आजवर पिलीव भागात कोणतीही विकास कामे केली नसली तरी आता तुम्ही जी कामे सांगत आहात ती सर्व माझ्या विभागात येत असून तुमचं सर्व प्रश्न मी सोडवीन, असे आश्वासन जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना दिले.
आणखी वाचा