Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शनिवारी (दि.22) रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे आज रविवारी (दि. 23) नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela 2027) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार असून, ते नाशिकमध्ये काही ठिकाणी भेटी देखील घेणार आहेत. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच ठाकरे गटाने त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. यानंतर नाशिक पोलिसांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिकचा विकास झाला नाही. जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नाही. महापालिकेच्या कामावर सत्ताधारी पक्षाचा अंकुश नाही, अशा विविध कारणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणारी सिंहस्थ आढावा बैठक होऊ देणार नाही, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.
ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना पोलिसांची नोटीस
यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या दरम्यान काळे झेंडे दाखवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. डी. जी. सूर्यवंशी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणतेही कृत्य केल्यास त्याला जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यांना जबाबदार धरून कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी नोटीसीत नमूद केले आहे. आता पोलिसांच्या नोटीसीनंतर ठाकरे गटकडून देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला विरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे शहिदांना अभिवादन
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आहे. शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरकडे रवाना झालेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे मुख्यमंत्री दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकमधील काही भागांची पाहणी देखील करण्याची शक्यता आहे. यानंतर नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडणार आहे.
आणखी वाचा