कटिहारः प्रेमात माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. प्रेमासाठी काहीही करणारी उदाहरण आपण अनेकदा पाहतो. मात्र यात अनेकदा चांगलीच उदाहरणं असतात असंही नाही. प्रेम मिळालं नाही म्हणून आत्महत्या करण्यासारखी पावलं देखील उचलली जातात. मात्र बिहारमधील एक प्रियकरानं आपल्या प्रेयसीचं नाक आणि कान कापून टाकला आहे.  कटिहार जिल्ह्यातील बरारी पोलिस ठाणे क्षेत्रातील  काढागोला घाट गावातील ही घटना आहे. प्रीतम कुमार असं या आरोपी प्रियकराचं नाव आहे.  

Continues below advertisement


एक महिला रविवारी छठ पूजेसाठी गंगा स्नान करायला गेली होती. याचवेळी पूर्णियाच्या गणेशपूरमधील रहिवासी असलेला प्रीतम कुमार तिथं पोहोचला आणि त्या महिलेची छेडछाड करु लागला. या वेळी दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली आणि त्यात प्रीतमनं त्या महिलेचं नाक आणि कान कापला. सदर महिला ही प्रीतमची पूर्वाश्रमीची प्रेयसी असल्याची माहिती आहे. 
  
या घटनेनंतर प्रीतमला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. प्रीतमनं सांगितलं की, मी माझ्या प्रेयसीला देवाप्रमाणं मानतो. मात्र ही चूक माझ्याकडून कशी झाली हे मलाही कळलं नाही. त्यानं सांगितलं की, मी माझ्या प्रेयसीला बदनाम करणार नाही. तर पीडित महिलेनं सांगितलं की, सदर युवकानं माझ्याकडून पैसे घेतले होते. आणि तो आता ते पैसे परत देत नाहीय. तो मला नेहमी माझ्या पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देतो. रविवारीही तो तिथं आला आणि मला मारहाण केली. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांनी मला वाचवलं.  


या घटनेनंतर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दोघांनाही या मारहाणीमध्ये दुखापत झाली आहे.  दरम्यान पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली आहे.  या युवकाने जरी आपल्या प्रेमाविषयी सांगितलं असलं तरी सदर पीडित महिलेनं मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे.