मुंबई : मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) प्रकरणात मोठं यश आलं आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या सायबर गुन्हेगाराच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये सापडल्याचं उघड झालं आहे. ओशिवरा पोलिसांनी एका सायबर गुन्हेगाराला अटक केली असता, त्याच्या बँक खात्यातून 1 कोटी 36 लाख रुपये सापडले आहेत. रियाझ उद्दीन अब्दुल सुभान अहमद असं वय 22 वर्षीय सायबर गुन्ह्यातील आरोपीचं नाव आहे. आरोपी मूळ आसाम येथील असून रहिवाशी आहे. ओशिवरा पोलिसांना या आरोपीला वरळी येथे मुक्कामाला असताना अटक केली.


मुंबईतील मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश


अ‍ॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर देण्याच्या बहाण्याने तो लोकांची फसवणूक करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी शेअर केलेली लिंक जपानशी जोडलेली असल्याने हे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तपासात आसामशी संबंधही उघड झाले आहेत. आरोपीच्या खात्यात मोठी रक्कम सापडल्याने अशा किती लोकांची फसवणूक झाली आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.


मुंबई पोलिसांना मोठं यश


तक्रारदार इस्माईल नूर मोहम्मद शेख (वय 30) हा व्यापारी, जोगेश्वरी पश्चिम येथील रहिवासी आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने अ‍ॅमेझॉनचे 150 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर ऑफर केले आणि त्याच्याशी एक लिंक शेअर केली गेली. इस्माईल शेखने लिंकवर क्लिक केल्यावर, त्याने वैराग सेंथिल नावाचे टेलीग्राम चॅट उघडले, ज्याने शेखच्या पेटीएम खात्यात 150 रुपये जमा झाल्याचा मेसेज मिळाला. फसवणूक करणाऱ्याने इस्माईल शेखला गुंतवणूक दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. शेखने लिंकवर क्लिक केले आणि त्याच्याकडे रक्कमेची मागणी केली. 


इस्माईल शेखने एका कामासाठी 5,000 गुंतवणूक केली आणि त्याला बदल्यात 6,500 रुपये मिळाले. मात्र, फसवणूक करणार्‍याने विविध कामे सुरुच ठेवत तब्बल 6.75 लाख रुपयेची फसवणूक केली, इस्माईल शेखला यामध्ये कोणतेही परतावा मिळाला नाही. अखेर इस्माईल शेख यांनी आयपीसी कायद्याच्या कलम 419, 420 आणि 34 आणि 66(सी) कलम अन्वये गुन्हा दाखल केला.


सायबर गुन्हेगाराच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये


ओशिवरा पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीचा खाते क्रमांक आणि बँक ओळखली आणि त्याचे आयसीआयसीआय बँक खाते गोठवले, ज्यात 1 कोटी 36 लाख रुपये होते. पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप, दोन मोबाईल, तीन वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, तीन वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, एक पासबुक, एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्ड जप्त केलं आहे.