ठाणे : भिवंडीतील शासनाच्या बालसुधारगृहातील धक्कादायक प्रकाराला कलाटणी मिळाली आहे. या बालसुधार गृहातील एका 40 वर्षीय शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला शारीरिकसुखाची ऑफर दिल्याचे समोर आले. खळबळजनक बाब म्हणजे  आधी तू मुलांना भडकव, मास्तरांवर हात उचलला तरच मी तुला शरीरसुख देईन असे आमिष त्या  शिक्षिकेने दाखवून पीडित मुलाचे लैगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


भिवंडी शहरातील कचेरीपाडा भागात राज्य शासनाच्या वतीने बालसुधारगृह असून हे बालसुधार गृह  भिवंडीतील एका संस्थेमार्फत  चालवण्यात  येते. विशेष म्हणजे  या  बालसुधारगृहात असलेल्या  मुलांच्या  देखभालीसह   शिक्षणासाठी  अनुदानित  संस्था  कार्यरत  आहे.  याच   संस्थेच्या वतीने येथील अल्पवयीन   मुलांच्या   शिक्षणासाठी  काही  शिक्षकांची  नेमणूक  करण्यात  आली.   मात्र   या  बालसुधार  गृहात  गेल्या   काही  वर्षांपासून  कार्यरत  असणाऱ्या  एका चाळीस वर्षीय शिक्षिकेने   येथील काही मुलांचे लैगिक शोषण केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलांकडून यासंदर्भातील तक्रारी बाल न्यायालयात  केल्या जात  होत्या.


त्यातच गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेने संस्था संचालक आणि बालसुधारगृहाच्या उपाधीक्षकाच्या विरोधात आठ महिन्यापूर्वी व्हिडीओमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून विनयभंग केल्याची तक्रार केल्याचं समोर आलं आहे. शिवाय जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केल्याचीही तक्रार केली. त्यानंतर सदर  शिक्षिकेला  निलंबित केले. शिवाय   बाल  न्यायालयीन  आदेशानुसार  संबंधित  प्रकरणाची  जिल्हा  महिला  बाल  विकास  समितीच्या अध्यक्षा आणि सदस्यांकडून  चौकशी  सुरु  असतानाच, बालसुधारगृहातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला 17 आणि 28 सप्टेंबर रोजी शरीर सुखाची ऑफर सदर शिक्षिकेने दिल्याचे चौकशीतून समोर आले. 


दरम्यान, पीडित मुलांसह आणखी दोन मुलांची  चौकशी  सुरू केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून आलेल्या   माहितीच्या  आधारे संरक्षण अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक प्रकाश दाजी गुडे (वय, 39) यांच्या  तक्रारीवरून त्या  शिक्षिकेवर 21 मार्च 2023 रोजी शांतीनगर  पोलीस  ठाण्यात  पोक्सो  कायद्या  अंतर्गत  गुन्हा  दाखल  करून पोलिसांनी  तपास  सुरु  केला.


सदर शिक्षिकेनेही संस्था संचालक आणि बालसुधार गृहाच्या उपाधीक्षकावर मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन दिवसापूर्वीच शांतीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.


दुसरीकडे  पीडित  मुलांवर  होणाऱ्या लैंगिक शोषण प्रकरणात  आणखी  एका  बालसुधारगृहातील  शिक्षिकेचा  समावेश असल्याचा  संशय  जिल्हा  महिला  बालविकास विभागाकडून  व्यक्त  करण्यात  आला  आहे.  या प्रकरणाची   सखोल  चौकशी  सुरु  असल्याची  माहिती  जिल्हा  बालसंरक्षण  अधिकाऱ्यांनी  दिली  आहे.  मात्र हा  धक्कादायक  प्रकार  समोर आल्याने भिवंडीतील शासकीय बालसुधारगृहात असलेल्या  पीडित  मुलांच्या  सुरक्षिततेचा  प्रश्न  निर्माण  झाला  आहे.


दरम्यान, भिवंडी पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त खैरनार यांच्याशी संर्पक साधला असता, बालसुधार गृहातील दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र दोन्ही प्रकरणातील आतापर्यत कोणालाही अटक केली नसल्याचे सांगितले आहे.


ही बातमी वाचा: