Bhandara News भंडारापुणे येथील अल्पवयीन कार चालकाने बेदरकारपणे कार चालवून केलेल्या भीषण अपघाताचे (Pune Accident) प्रकरण सध्या गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भंडारा (Bhandara) पोलीसही सतर्क झाले आहेत. त्या अनुषंगाने भंडारा जिल्हा वाहतूक शाखेनं अल्पवयीन बाईकस्वारांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान शहरातून भरधाव बाईक चालवणाऱ्या सात अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांच्या पालकांवर भंडारा पोलीस (Bhandara Police) ठाण्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आता सातत्यानं करण्यात येणार असून पालकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देवू नये, असं आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


सात अल्पवयीन चालकांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल


पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना आता राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्या अनुषंगाने भंडारा जिल्हा वाहतूक शाखेनं अल्पवयीन बाईकस्वारांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. अलिकडे वाढते अपघाताचे प्रमाण आणि त्यातून होणारी जीवितहानी लक्षात घेता आता वाहतूक पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. परिणामी, अल्पवयीन मुलांना गाडी देणं 7 पालकांच्या चांगलच अंगलट आलं आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत सात अल्पवयीन चालकांच्या वडिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पालकही आता सतर्क झाले आहेत.


आजपासून वाहतूक नियमामध्ये मोठे बदल


ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर झाले असून आज 1 जून 2024 पासून तुम्ही RTO ऐवजी खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकणार आहात. या केंद्रांना परवाना पात्रतेसाठी चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी अधिकृत करण्यात येणार आहे. त्याशिवाय वाहतूक नियम मध्येही बदल झाले आहे. वेगाने वाहन चालवल्यास दंड हा  1,000 ते  2,000 च्या दरम्यान असेल. मात्र, जर एखादा अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेला तर त्याला  25,000 इतका मोठा दंड द्यावा लागणार आहे. तर वाहन मालकाची नोंदणी रद्द करण्यात येईल. तर अल्पवयीन व्यक्ती 25 वर्षांची होईपर्यंत परवान्यासाठी अपात्र असेल.


इतर महत्वाच्या बातम्या