Bhandara News भंडारा : प्रत्येक शहरात व्यावसायिक स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे सध्या दुकानात ग्राहकांची आणि दुकानासमोर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी बघायला मिळते. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर हे व्यावसायिक दृष्ट्या जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर आहे. इथं नजीकच्या मध्यप्रदेशातूनहीं नागरिक खरेदी-विक्रीसाठी येत असतात. ग्राहकांच्या वाहनांमुळे वर्दळीच्या मुख्य बाजारपेठेतील मार्गावर अनेकदा वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. यावर नियंत्रण मिळावं आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करून तुमसर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, तुमसरच्या सहायक पोलीस अधीक्षक रश्मिता राव यांनी एक मोहीम हाती घेतली आहे.


या कारवाईत त्या स्वतः एकट्याच तुमसर शहराच्या मुख्य बाजारपेठेत पायदळ फिरून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करीत आहेत. सध्या वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातोय. त्यामुळे तुमसरच्या लेडी सिंघम दिसताच नागरिकांची एकच धावपळ होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 


बेशिस्त वाहनधारकांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा


भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मागील तीन दिवसात साधारणतः शंभराहून अधिक वाहनधारकांवर वाहतुकीचे नियम तोडल्याची कारवाई करण्यात आली आहे. अशी कारवाई करणाऱ्या त्या भंडारा जिल्ह्यातील एकमेव आणि पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सहायक पोलीस अधीक्षक रश्मिता राव या दिवस असो की रात्र, रस्त्यावर कारवाईसाठी दिसताच नागरिकांच्या तोंडातून लेडी सिंघम आल्याचीच चर्चा सुरू आहे. जे वाहतुकीचे नियम तोडतात त्यांची कारवाईतून वाचण्यासाठी वाहनधारकांची एकच धावपळ बघायला मिळत आहे.  


अवघ्या दहा रुपयांसाठी एकावर प्राणघातक हल्ला


उधारीवर घेतलेल्या दहा रुपयांवरून दोन मजुर मित्रांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानं एकानं दुसऱ्या मित्रावर धारदार शस्त्रानं हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार काल सायंकाळी भंडारा शहरातील मुख्य वर्दळीच्या गांधी चौकात झाला. याच गांधी चौकात मागील वर्षी किरकोळ वादातून एका लस्सी विक्रेत्यावर चाकुनं प्राणघातक हल्ला झाला होता. त्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. काल घडलेल्या या घटनेनं भंडारा शहरात एकच खळबळ उडाली आहे.


गंभीर जखमी असलेला सचिन रंगारी (वय 30 वर्ष) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, हल्लेखोर फरार आरोपीच्या विरोधात भंडारा पोलीसात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या