Bhandara News भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मध्यरात्री सुरू असताना तिथं पोहोचलेल्या ठाणेदारानं दबंगगिरी करीत 60 वर्षीय वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. हा प्रकार रामटेक - गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्यातील कांद्री इथं 7 जूनच्या मध्यरात्री घडला. हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. भालचंद्र तुरस्कर असं ठाणेदारांनी मारहाण केलेल्या वृद्ध हॉटेल व्यावसायिकाचं नावं आहे. राष्ट्रीय महामार्गावर मागील अनेक वर्षांपासून तुरस्कर यांचं हॉटेल असून प्रवास करणारे वाहनधारक चहा पिण्यासाठी इथं थांबतात.


7  जूनला आंधळगावंचे ठाणेदार विवेक सोनवणे हे त्यांचे रायटर दिलीप वलदे यांच्यासोबत हॉटेलमध्ये पोहचलेत आणि हॉटेल व्यावसायिकाला मारहाण केली. यावेळी त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण करताना मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिक तुरस्कर यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आता काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


भंडारा पोलीस प्रशासनात नेमकं चाललय तरी काय?


नुकतेच भंडाऱ्यात न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीला शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप  भंडाऱ्याचे (Bhandara) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात बागुल यांच्यावर भंडारा पोलीस (Bhandara Police) ठाण्यात 7 जूनला भादंवी 354 अ (2), 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद असलेल्या पोलीस विभागानं एवढ्या गंभीर आरोपानंतर DYSP बागुल यांना अवघ्या 24 तासात भंडारा पोलीस ठाण्यातून जामिनावर सोडलं असल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.गुन्हा दाखल झाल्यानंतर DYSP डॉ. अशोक बागुल हे आता वैद्यकीय रजेवर गेले आहेत.


या घटनेचा संपूर्ण अहवाल पोलीस महानिरीक्षकांकडं पाठविला असल्याची माहिती भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली होती. त्यामुळे आता भंडाऱ्याचा प्रभार तुमसरच्या IPS रष्मिता राव यांच्याकडं सोपविण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा भंडाऱ्यात पोलिसांकडूनच वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला मारहाण केल्याने भंडारा पोलीस प्रशासनात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.  


तात्काळ कारवाईची मागणी  


या प्रकरणातील हॉटेल व्यावसायिक तुरस्कर यांना मारहाण करणाऱ्या ठाणेदारावर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक भालचंद्र तुरस्कर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी घडलेल्या प्रकरणाची तक्रार भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना केली असून ठाणेदार सोनवणे यांच्यावर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. त्यामुळे या प्रकरणी आता काय कारवाई केली जाते या कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या