Bhandara News भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी  (Paddy Buying Center) केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची अफरातफर केल्याप्रकरणी भंडाऱ्यात आणखी एक धान खरेदी केंद्र चालकांचा घोटाळा उघड झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara News) पवनी तालुक्यातील सावरला येथील आधार बहुउद्देशीय सहकारी संस्थेचा हा घोटाळा आहे. 2021-2022 च्या खरीप आणि रब्बी हंगामात या संस्थेच्या अध्यक्ष आणि 11 संचालकांनी तब्बल 42 कोटी 78 लाख 864 हजार रुपयांच्या 1470.40 क्विंटल खरेदी केलेल्या धानाची अफरातफर केल्याचं चौकशीत समोर आलं आहे. या प्रकरणामुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सहा धान खरेदी केंद्रांवर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 


अध्यक्षांसह 11 संचालकांवर गुन्हा दाखल


भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचं उत्पादन घेतात. अशातच रब्बी हंगामातील धानाची विक्री (Paddy), आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी नोंदणी करणे गरजेचे असतं. या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत होती. मात्र, यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत अजुनही अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या वतीने दिलेली मुदत वाढण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) रब्बी हंगामाच्या धान विक्रीकरिता मोठा दिलासा मिळाला आहे.


पाच संस्थेविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल


मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात सलग धान खरेदी केंद्रावरील गैरप्रकार समोर येत आहेत. अशातच आता भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सावरला येथील आधार बहुउद्देशीय सहकारी संस्थेचा घोटाळा उघड झाला आहे. शासन आणि फेडरेशनची फसवणुक केल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांच्या तक्रारीवरून पवनी पोलीसात कलम 409, 420, 468, 471, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांवर शासकीय धानाची अफरातफर केल्या प्रकरणी पाच संस्थेविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


राईस मिलर्सच्या प्रलंबित मागण्यांमुळे धानाची भरडाई रखडली


भंडारा जिल्ह्याप्रमाणेच गोंदिया जिल्ह्यात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची शेती करतात. शासनाच्या वतीने आदिवासी बहुल भागात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांकडून धान खरेदी केला जातो. मात्र, आदिवासी महामंडळाचे गोडाऊन नसल्याने खरेदी केलेला धान ताडपत्रीचा आधार घेत मोकळ्या जागेवर ठेवण्यात येते. यावर्षी राईस मिलर्सच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने धानाची उचल न केल्याने गेल्या 4 महिन्यांपासून हा धान उघड्यावर तसाच पडून आहे. यावर्षी अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्याला झोडपून काढल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या गावातील खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाला अंकुर फुटल्याने केंद्र चालकांचे नुकसान झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या