Bengaluru Crime : नवी दिल्ली : बंगळुरूतील (Bengaluru) घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. बंगळुरूमध्ये पेईंग गेस्टमध्ये राहणाऱ्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. फुटेजमध्ये आरोपी महिलेवर सपासप वार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.                     


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारं सीसीटीव्ही फुटेज अस्वस्थ करणारं आहे. व्हिडीओमधील तरुणीच्या हत्येचा थरार अंगावर शहारे आणणारा आहे. व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी हातात कसली तरी, बॅग हातात घेऊन महिलेच्या खोलीच्या दिशेनं पोहोचतो आणि नंतर दरवाजा ठोठावतो. फुटेजमध्ये दरवाजा दिसत नाही, पण काही सेकंदांनी तरुणी दरवाजा उघडते आणि आरोपी तिला बाहेर खेचतो. त्यानंतर आरोपी आणि तरुणीमध्ये झटपाट होत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. तेवढ्या झटापटीतच आरोपी तरुणीवर सपासप वार करायला सुरुवात करतो. काही मिनिटांपर्यंत आरोपी वार करत राहतो, त्यानंतर तरुणीला तिथेच सोडून तिथून पळ काढलो. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात तशीच बसून राहते आणि मदतीसाठी आरडाओरडा करत असते.                  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या करणारा आरोपी मुलीच्या मैत्रिणीचा प्रियकर आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत मृत्यू झालेली तरुणी मूळची बिहारची आहे. ही तरुणी 24 वर्षांची असून तिचं नाव कृती कुमारी असं आहे. तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करत होती.                


मंगळवारी घडली घटना 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कोरमंगला वीआर लेआऊट पीजीमध्ये मंगळवारी रात्री 11 ते साडेअकरा दरम्यान घडली. पीजीच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत कृती राहत होती. घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.                                


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोरमंगला पोलीस आणि दक्षिण पूर्व विभागाच्या डीसीपी सारा फातिमा यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकारी सध्या सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून संशयितावर लक्ष ठेवून आहेत. हा संशयित तरुणीचा ओळखीचाच असल्याची माहिती समजत आहे.         


आरोपीला अटक 


बंगळुरू पोलिसांनी 23 जुलै रोजी एका 24 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी मुख्य संशयिताला अटक केली आहे. आरोपी अभिषेकला भोपाळमधून अटक करण्यात आली. कृती कुमारीची हत्या करून तो भोपाळला पळून गेला होता. पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.