बीड : जिल्ह्यातील कुटे उद्योग समूहाच्या (Kute Group Beed) अर्चना कुटे (Archana Kute) यांच्या भावाचे पाच कोटी रुपयांसाठी अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तलवाडा फाटा आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका महिला आरोपीचादेखील समावेश आहे.
अर्चना कुटे यांचे भाऊ शिवाजी घरत यांचं अपहरण झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने अर्चना कुटे यांना फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरू केला.
टीप मिळाली आणि सापळा रचून आरोपींना अटक
हा तपास सुरू असताना अपहरण करणारे गेवराई तालुक्यातल्या तलवाडा फाट्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पूजा देशभ्राता आणि अन्य एका आरोपीला अटक केली असून शिवाजी घरत यांची सुटका केली.
ठेवी अडकल्याने अपहरण की आणखी काही?
कुटे यांच्या मालकीची असलेली ज्ञानराधा बँक सध्या आर्थिक अडचणीत असून या बँकेमध्ये अनेकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. त्यामुळे अर्चना कुटे यांचे भाऊ शिवाजी घरत यांचं अपहरण केल्याची कबुली अटक केलेले आरोपींनी पोलिसात दिली. शिवाजी घरत यांचे अपहरण हे बँकेतील पैसे मिळावेत यासाठी करण्यात आलं होतं की त्यामागे आणखी कोणता हेतू होता या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणांमध्ये आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.
सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचा भाजप प्रवेश
महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला (Tirumala) उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.
उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात भाजपला आणखी बळ मिळणार आहे. उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचे नावलौकिक केलं. 'द कुटे ग्रुप'मुळे बीड जिल्ह्यात बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं महिलांना नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे.
ही बातमी वाचा :