वाशी (नवी मुंबई) : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून प्रवास करत मुंबईमध्ये पोहोचलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज (26 जानेवारी) एक पाऊल मागे टाकत सरकारला निर्णय घेण्यास थोडा अवधी दिला आहे. करण्यात आलेल्या मागण्यांवर आज रात्रीपर्यंत बाबतीत आदेश काढावा. अन्यथा, उद्या (27 जानेवारी) दुपारी बारानंतर आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला आहे. जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी, नवी मुंबईत या ठिकाणी थांबला आहे. जरांगे पाटील यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा घेत समाजाला माहिती दिली. 



आझाद मैदानात जाणार म्हणजे जाणार 


आज रात्रीपर्यंत शासन निर्णयाची वाट पाहतो, अन्यथा उद्या आझाद मैदानाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अध्यादेश मिळाला तरी आझाद मैदानाकडे जाणार आणि नाही मिळाल्यास त्या ठिकाणी उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आहे. समाजासाठी आपण एकही पाऊल मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. 


मनोज जरांगे यांनी कोणत्या मागण्या केल्या? 



  • नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या

  • शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या 

  • कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा 

  • जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा

  • आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा 

  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या

  • SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या 

  • वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या

  • रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही


37 लाख जणांना प्रमाणपत्र मिळाले


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्याचे सांगत यामधील सरकारकडून 37 लाख जणांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याचे म्हणाले. तसेच ज्या 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं आहे, त्यांचा डेटा द्यावा, अशी मागणी केल्याचे सांगितले. जरांगे पाटील यांनी नोंदी सापडणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली आहे. हे प्रमाणपत्र देत असताना शपथपत्र द्यावे, अशी सुद्धा विनंती केली. कोणी शपथपत्र खोटं सादर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. 


दरम्यान जरांगे पाटील यांनी 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुला-मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत करा, अशी सुद्धा मागणी केली. जिल्हास्तरावर वस्तीगृह बांधण्याची मागणी सुद्धा केली आहे. मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका आणि जर भरती करण्यात आली तर त्यामधील मराठा आरक्षणाच्या जागा राखी ठेवण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा केली.


आंतरवाली सराटीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीकडे सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी पत्राची सुद्धा मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी 2014 मध्ये ईसीबीसी अंतर्गत ज्या नियुक्त रखडल्या आहेत त्या सुद्धा त्वरित देण्याची मागणी केली. वर्ग एक व वर्ग दोन आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त द्या अशी मागणी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या