Badlapur News : बदलापूर : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, त्या मुली केवळ तीन आणि सहा वर्षांच्या होत्या, अशी माहिती मिळत आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आता कारवाई करण्यात आली आहे. शाळेनं माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. सजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. 


"शिक्षिकाही एक स्त्री, मुलीची परिस्थिती, तिच्या चालण्यातला बदल तिला कळला नाही?"


"मुलगी बराच वेळ वर्गात आली नाही, त्यावेळी तुमच्या लक्षात आलं नाही का? त्यानंतर ज्यावेळी ती मुलगी वर्गात आली, त्यावेळी शिक्षिकाही एक स्त्री आहे. त्यावेळी तिला तिची परिस्थिती कळाली नाही का? ही मुलगी अशी का चालतेय? तिच्यात काहीतरी बदल दिसतायत... असे प्रश्न शिक्षिकेला पडले नाहीत. कारण ज्या मुलीवर अत्याचार झाला, तिच्या कुटुंबाकडून मला कळालं की, मुलीच्या चालण्यात बदल झाला होता... कारण डीप रॅप्चर होतं. त्यामुळे त्या मुलीला प्रचंड त्रास झाला. आठ दिवस आधी त्या मुलीवर अत्याचार झालेला. त्या मुलीला ताप येत होता, त्यामुळे ती शाळेत येत नव्हती. पण, त्यानंतर बरोबर 12 दिवसांनी दुसऱ्या मुलीला टार्गेट केलं गेलं. त्या मुलीलाही रॅप्चर आहे." , असं वक्तव्य संतप्त महिलेनं केलंय. 


"पत्रकारांना धमक्या देण्यात आल्यात, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरूये"


"एवढं सगळं घडेपर्यंत इतके दिवस शाळा प्रशासन काय करत होतं? हा माझा मुद्दा आहे. ज्या नराधमानं दुष्कृत्य केलं, त्याला 15 दिवसांपूर्वी कामाला ठेवलं होतं. त्या मुलाचं क्रिमिनल बॅकग्राउंड आहे, असंही आमच्या निदर्शनास आलं. एवढंच काय, त्याच्या वडिलांचाही क्रिमिनल बॅकग्राउंड आहे, असंही निदर्शनास आलं. मला शाळा प्रशासनाला विचारायचं आहे की, अॅडमिशनपूर्वी जर तुम्ही मुलांचे इंटरव्यू घेता. तर, मग तुम्ही शाळेत जे कर्मचारी ठेवता, त्यांचे इंटरव्ह्यू नाही का घेऊ शकत? त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन, त्याची एनओसी, याचा कुठे रेकॉर्ड आहे का? त्याची मनस्थिती कशी आहे? हा विकृत तर नाही ना? याची शहानिशा तुम्ही करू शकत नाही? त्यानंतर पत्रकारांनाही धमक्या दिल्या जातायत. हा काय प्रकार आहे. पत्रकारांनी मला ऐकवलंय, त्यांना आलेले फोन... मी स्वतः राम पाटकरांचे मेसेज पाहिलेत... शाळा प्रशासन जर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर पालकांसोबतच मुलांसाठीही हे घातक आहे.", असा दावा नागरिकांनी केला आहे. 


दरम्यान, बदलापुरातील प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. प्रत्येक स्तरातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा पालकांकडून केला जात आहे. पत्रकारांना धमक्या देण्यात आल्या. तसेच, डॉक्टरांनीही अहवाल देण्यासाठी खूप वेळ लावला. एवढंच नाहीतर बदलापूर पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक शुभदा शितोळेंनीही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.