Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर (Pune Porsche Accident) परिसरात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात आणखी काही महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. पॉर्शे अपघात प्रकरणानंतर ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी दोघांची नावे आहेत. अल्पवयीन कारचालकासोबतच आणखी दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताची अदलाबदल करण्यात आली होती. त्या प्रकरणात त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.


पुण्यातील कल्याणीनगर अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणातील अटक आरोपींच्या जामीन अर्जावर पुणे सत्र न्यायालय आज निर्णय देणार आहे. दारुच्या नशेत पोर्शे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी ससुन रुग्णालयात या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आईवडील विशाल आणि शिवानी अग्रवाल यांच्यासह ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्यासह अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड हे आरोपी आहेत. या सहा आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद पूर्ण केला असुन सरकारी वकीलांचा युक्तिवाद देखील पुर्ण झालाय. त्यावर न्यायालय आज निर्णय देणार आहे. 


या प्रकरणात अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी विशाल अगरवाल, ससून रूग्णालयाचे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड हे सध्या येरवडा कारागृहात आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपींनी गुन्हा घडल्याच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रांसह पुराव्यामध्ये छेडछाड करण्याबरोबरच नवीन पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 


अल्पवयीन मुलाचेच नव्हे तर त्याच्या दोन मित्रांचेही बल्ड रिपोर्ट बदलले


पोर्शे अपघात प्रकरणात वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती आता समोर आली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी अल्कोहोल नसलेल्या कापसाचा वापर करण्यात आला असून, थेट सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) अधिकार्‍याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले आहेत. दोषारोप पत्रात हे नमूद करण्यात आले आहे. 


नेमकं काय घडलं?


कल्याणीनगर  (Kalyani Nagar accident Update) येथे १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यामध्ये या तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मुलाला १५ तासांत जामीन देण्यात होता. यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.