Uddhav Thackeray vs Ajit Pawar : पिंपरी-चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहे. एवढंच काय तर, आयाराम गयारामांची ये-जा देखील सुरू आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर यंदाची पहिलीच विधानसभा असल्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यात काही शंकाच नाही. अद्याप निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीदेखील संपूर्ण साम, दाम, दंड भेद वापरुन विरोधकांना मात देण्यासाठी सर्वांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अजित पवारांना ठाकरेंनी जोर का झटका दिल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अजित पवारांच्या संपर्कात असलेले पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 


महायुतीला (Mahayuti) पाठींबा देत, सत्तेत सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election 2024) पुणे, पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. अशातच आपली ताकद वाढवण्यासाठी अजित दादा गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नात होते. पण, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे (Ravi Landge) आज अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडून उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत. 


उद्धव ठाकरे आज अजित पवारांना पुन्हा एकदा जोर का धक्का देणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे आज ठाकरेंची मशाल पेटवणार आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करत रवी लांडगे मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते हाती शिवबंधन बांधणार आहेत. 


साधारणतः दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यापासून लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. लोकसभेत ही लांडगेंनी घड्याळाचा दणक्यात प्रचार केला. मात्र, भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या रवी लांडगेंना महायुतीतून तिकीट मिळणार नाही हे उघड आहे. म्हणूनचं रवी लांडगेंनी महाविकासआघाडीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 


अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी आधीचं शरद पवार गटात प्रवेश करत, तुतारीसाठी दावा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल, ही शक्यता गृहीत धरून रवी लांडगे मशाल हाती घेण्यासाठी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लांडगेंचा प्रवेश होणार आहे.


कोण आहेत रवी लांडगे?


माजी विरोधी पक्ष नेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव, तसेच, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे म्हणजे, रवी लांडगे. भाजप युवा मोर्चाचं शहराध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. 2017 च्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे बिनविरोध निवडून आलेले एकमेव नगरसेवक होते. गेल्या अनेक वर्षांपासून रवी लांडगे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. तसे, वेळोवेळी त्यांचे प्रयत्न पाहायलाही मिळाले आहेत. 


दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर रवी लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. मात्र, भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या रवी लांडगे यांनी अखेर अजित दादांची साथ सोडून महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभेच्या तिकीटासाठी त्यांनी ठाकरेंच्या मशालीची निवड केल्याचं कळतंय. तसेच, आज त्यांचा पक्षप्रवेशही होणार आहे.