Aurangabad Crime News: औरंगाबाद (Aurangabad) ग्रामीणच्या पाचोड पोलिसांनी (Pachod Police) मोठी कारवाई करत चक्क अफूची शेती करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहे. पैठण तालुक्यातील गाव तांडा खुर्द शिवारात एका शेतात पोलिसांनी छापा टाकून अफूची 250 झाडे जप्त असून, यात दोन लाख 14 हजार 774 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यात एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून पाचोड  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामभाऊ गोर्ड असे आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील गाव तांडा खुर्द येथील शेतकरी रामभाऊ गोर्ड यांनी त्यांच्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने कारवाईसाठी पोलीस पथक तयार केले. दरम्यान, गुरुवारी (23 फेब्रुवारी) दुपारी पथकाने गावतांडा खुर्द शिवारातील शेतीवर छापा टाकला. यावेळी संशयित रामभाऊ गोर्ड यांच्या शेत (गट नंबर 27) शेताच्या मधोमध गहू आणि लसूण पिकाच्या आडोशाला अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसले. यावेळी बअर्धा गुंठा जागेत अफूचे पीक घेतल्याचे पथकाच्या पाहणीत समोर आले. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.


दोन लाखांचा मुद्देमाल जप्त


पोलिसांनी यावेळी केलेल्या पाहणीत शेतातून पूर्ण वाढ झालेली दोन ते अडीच फूट उंचीची अफूची 250 झाडे आढळून आली. ज्याची अंदाजे किंमत दोन लाख 14 हजार 774 रुपये आहेत.  याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. तर पुढील तपास पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल पा. नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांच्यासह कर्मचारी करीत आहे.


पीक लावून चार-पाच महिने झाल्याचा अंदाज 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अफूच्या झाडांची उंची दोन-अडीच फूट असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे हे पीक लावून किमान चार ते पाच महिने झाल्याचा अंदाज आहे. तर झाडांची वाढ पूर्णपणे झाली असून, पीक काढणी आधीच पोलिसांनी छापा मारला. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून, गुन्हाही दाखल केला आहे. तर आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.