Solapur News : सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या माढा (Madha) तालुक्यातील मोडनिंब इथे विवाहासाठी (Marriage) आलेल्या खाजगी बसने (Private Bus) अचानक पेट घेतल्याने विवाह मंडपात अग्नितांडव (Fire) सुरु झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झाली नसली किंवा कोणाला दुखापत झालेली नसली तरी बस जळून खाक झाली आहे. हे वऱ्हाड पुण्याहून माढ्यातील मोडनिंब इथे आलं होतं.
काय घडलं नेमकं?
काल (23 फेब्रुवारी) रात्री पुणे इथून नवरदेवाचं वऱ्हाड या खाजगी बसमधून आलं होते. वऱ्हाडी मंगल कार्यालयात उतरले आणि थोड्याच वेळात बसने अचानक पेट घेतला. तातडीने गाडीत बसलेल्या चालकाला खाली उतरवून नागरिक आणि वऱ्हाडी मंडळींनी बस विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान शेजारी असणारी सर्व वाहनेही तातडीने हलवल्याने मोठी दुर्घटना टळली. रात्री उशिरा बस विझवण्यात यश आले असले तरी तोपर्यंत ही बस जळून खाक झाली होती.
लग्नासाठी पुण्याचं वऱ्हाड सोलापुरात
सोलापूरच्या मोडनिंब इथल्या अश्विनी सौदागर शिंदे या तरुणीचा विवाह पुण्यातील नारायण पेठच्या रोहित राजेंद्र मसूरकरसोबत आज (24 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजून 21 मिनिटांनी नियोजित आहे. मुलीच्या घरी म्हणजे मोडनिंब इथे हा विवाह पार पडणार आहे. त्यासाठी नवरदेवाचं वऱ्हाड खासगी बसने पुण्याहून रात्रीच इथे दाखल झालं होतं. या बसमध्ये 35 प्रवासी होते.
बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
वऱ्हाड असलेली खासगी बस माढ्यातील शिवपार्वती मंगल कार्यालयाबाहेर पोहोचली. इथे सगळे वऱ्हाडी बसमधून उतरले. बस चालक उतरायचा होता, तेव्हाच बसने अचानक पेट घेतला. इतरांनी प्रसंगावधान दाखवत चालकाला तातडीने बसबाहेर काढलं आणि आग विझवण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु हे एवढ्या झटपट घडलं की नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले आणि बघता बघता बस जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अथवा कोणालाही दुखापत झाली नाही. शिवाय आग लागल्याचं लक्षाच येताच आजूबाजूला असलेल्या जवळपास 30 इतर वाहनंही वेळीच बाजूला केल्याने आणखी मोठी दुर्घटना टळली.. विशेष म्हणजे यातील काही वाहन सीएनजीवर चालणारी होती.
लग्न नियोजित मुहूर्तावरच होणार
दरम्यान लग्नाच्या आधी बस जळण्याची दुर्घटना घडली असली तरी लग्न नियोजित शुभमुहूर्तावरच पार पडणार आहे, असं उभयंतांनी सांगितलं आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजून 21 मिनिटांनी अश्विनी शिंदे आणि रोहित मसूरकर हे लग्नगाठ बांधणार आहेत.