Nagpur News : किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एकमेकांचा जीव घेण्यापर्यंतच्या घटना अलीकडे वाढल्या आहे. अशीच एक घटना नागपुरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. एकाच कुटुंबातील दोन भावांच्या घरातील सामायिक विहिरीमधील पाण्यावरुन झालेल्या वादात भावाने रागाच्या भरात दुसऱ्या भावाचा खून केला आहे. यात वाद सोडविण्यासाठी आलेले आई-वडीलसुद्धा जखमी झाले आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाहू कुटुंबाचे घर आहे. दोन्ही भावाचे कुटुंब एकाच विहिरीतून पाणी वापरत होते. त्या विहिरीची मोटर लावून पाणी घेण्यावरुन वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. त्यात अभिषेक शाहू (वय 39) यांचा जागेवरच मृत्यू झाला. हाणामारीमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेले आई-वडीलसुद्धा यात जखमी झाले आहे. पोलिस उपायुक्त संजय सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाच्या घराचे बांधकाम सुरु होते. त्यामुळे त्याला जास्त पाणी लागत होते. त्यातून झालेल्या वादात अभिषेकची हत्या झाली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार अभिषेक आणि त्याच्या भावाच्या घरामध्ये पाण्याची एकच विहिर होती. दोन्ही कुटुंब त्या विहिरीतला पाणी वापरत होते. बुधवारी सकाळी विहिरीतील पाण्याच्या मोटरवरून दोन्ही कुटुंबात वाद झाले. दुपारी बाराच्या सुमारास वाद वाढला असताना आरोपींनी अभिषेक शाहू आणि त्याच्या आई-वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये अभिषेकचा घटनास्थळीस मृत्यू झाला. तर आई-वडील आणि आणि एक नातेवाईक गंभीर जखमी आहे.
या संदर्भात अधिक माहितीकरिता कोतवाली पोलिसांशी संवाद साधला असता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून सध्या काही माहिती देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. तसेच जखमींवर उपचार सुरु असल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
महत्त्वाची बातमी