अमरावती: अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नांदगावपेठ जवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एक भरधाव कार थेट येथील एका स्थानिक नागरिकाच्या घरात शिरल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्ता अडवून धरला आहे. परिणामी, अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या तासभरापासून ठप्प असल्याची माहिती ही पुढे आली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आता अपघाताची घटना घडल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या तासभरापासून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र आपल्या घराच्या किरकोळ मागणीसाठी नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्ग धरून रोखल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे.
समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेलची चोरी; घटना मोबाईल मध्ये कैद
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रक मधून डिझेल चोरीचा प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून डिझेल चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. मात्र, वाशिमच्या कारंजा येथील समृद्धी महामार्गावर टोलनाका परिसरात उभ्या असलेल्या ट्रक मधून मध्यरात्री ट्रकच्या डिझेल टाकी मधून मशीनच्या सहाय्याने डीजल चोरीचा प्रकार समोर आला आहे. या परिसरातीलच हे डिझेल चोर असल्याचं समोर येत आहे. गेल्या अनेक वेळा हा प्रकार एका ट्रक चालकाला दिसला. त्यानंतर त्यांनी मोबाईल द्वारे हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करत याबद्दलची माहिती दिली आहे. आता नेमकं पोलीस या प्रकरणाची कशी दखल घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र खरोखरच समृद्धी महामार्ग हा प्रवासासाठी सुखकर आहे का? असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलाय.
रेल्वेच्या धडकेत एक वाघाचा मृत्यू
चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत एक वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंदेवाही - आलेवाही स्टेशनच्या दरम्यान आज सकाळी बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने वाघाला धडक दिली आहे. यात वाघाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा